Prachi Yadav, Para Canoe World Cup: भारताची कन्या प्राची यादव हिने पॅरा कॅनो वर्ल्डकप मध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. मूळची मध्य प्रदेशची असलेली पॅरा कॅनो प्लेयर (Para Canoeist) प्राचीने वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी कांस्यपदकाची कमाई केली. पोलंडमध्ये रंगलेल्या या स्पर्धेत तिने अप्रतम कामगिरी करत सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. पॅरा कॅनो वर्ल्डकपमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली. तिने परदेशात ही अभिमानास्पद कामगिरी करून दाखवली.
प्राचीने व्हीएल-२ महिला गटात २०० मीटर स्पर्धेत पदक मिळवून दाखवलं. कयाकिंग आणि कॅनोइंगमध्ये पदक जिंकणारी प्राची भारताची पहिली खेळाडू ठरली. प्राचीने स्पर्धेत 1:04.71 सेकंदाच्या वेळेसह कांस्यपदकाची कमाई केली. कॅनडाची ब्रिआना हेनेसी प्राचीपेक्षा पुढे होती. तिने 1:01.58 सेकंद इतक्या वेळेत स्पर्धा पूर्ण करत रौप्यपदक पटकावले. तर ऑस्ट्रेलियाच्या सुझॅन सैपलने 1:01.54 सेकंदांमध्ये स्पर्धा संपवत सुवर्णकमाई केली. कयाकिंग आणि कॅनोइंग या क्रीडा प्रकारात भारताकडून ही आतार्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली.
भारतीय खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी-
याआधी प्राचीने टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेत सेमी फायनलपर्यंत मजल मारली होती. पण तिला पदक मिळवता आलं नव्हतं. प्राची व्यतिरिक्त मनिष कौरव हिने केएल-३ पुरूषांच्या २०० मीटर स्पर्धेत तर मनजीत सिंग व्हीएल-२ पुरूषांच्या गटात २०० मीटर स्पर्धेत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तसेच जयदीपने वीएल-३ पुरूषांच्या गटातील स्पर्धेत अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं होतं, पण त्याला पदक मिळवता आलं नाही.