भारत-न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका अटीतटीची होईल, यात शंका नाही. अलीकडे भारतात झालेल्या टी-२० विश्वचषकात किवी फिरकीपटूंनी भारतीय फलंदाजांची भंबेरी उडविली होती. हा कटू अनुभव लक्षात घेऊन भारतीय संघ गाफील राहणार नाही. दोन्ही संघांचे नेतृत्व करणारे जगातील अव्वल फलंदाजांपैकी एक खेळाडू आहेत. त्यांच्यातील द्वंद्व पाहण्यासारखे असेल. सांघिक खेळात प्रतिस्पर्धी संघाशी लढताना स्वत:च्या संघाची कामगिरी ढेपाळणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागते. त्यामुळे कोहली आणि विल्यम्सन दोघेही स्वत:च्या कामगिरीची अधिक काळजी घेतील.विल्यम्सनचे क्रिकेटमध्ये धडाक्यात आगमन झाले. त्याच्या रूपाने क्रिकेट विश्वात नव्या टॅलेंटची नांदी झाली. कुठल्याही संघाविरुद्ध आणि कुठल्याही परिस्थितीत फलंदाजी करण्याची त्याच्यात क्षमता आहे. विविध प्रकारच्या खेळपट्ट्यांवर त्याने अनेकांचा मारा झोडपून धावा काढल्या आहेत. भारताला त्याच्या फलंदाजीवर नियंत्रण ठेवावेच लागेल. केनला बाद करणे म्हणजे विजयाचे दार उघडण्यासारखेच आहे. सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये अनुभव सिद्ध करणारा आणखी एक खेळाडू म्हणजे रॉस टेलर ! मार्टिन गुप्तिल आणि लेंथम ही डाव्या-उजव्या फलंदाजांची जोडी सलामीला कमाल करू शकते.या मालिकेत भारतीय फलंदाजीचा क्रम क सा असावा? भारतात किवीच्या जलद माऱ्याला तोंड देत सावध सुरुवात करणारे सलामीवीर असावेत. लोकेश राहुल-शिखर धवन ही उजव्या-डाव्या फलंदाजांची जोडी चांगली राहील; पण तरीही धवन धावा काढण्यात अपयशी ठरला. अनेक सामन्यांत संधी मिळूनही त्याला संधीचे सोने करता आले नाही.दुलीप करंडक सामन्यात नाबाद द्विशतक ठोकणाऱ्या चेतेश्वर पुजाराने संघात स्थान मिळविले. तो संघात अकरांमध्ये राहू शकतो; पण भारताने ५ गोलंदाजांना पसंती दिल्यास रोहित शर्माला राखीव बाकावर बसावे लागेल. आश्विन, जडेजा, मिश्रा यांच्यासोबत वेगवान भुवनेश्वर आणि शमी किंवा उमेश यादव, अशी गोलंदाजीत कोहलीची पसंती असू शकते. मधल्या काळात टीम इंडियाला विश्रांतीचा वेळ मिळाला. याचा अर्थ, न्यूझीलंडविरुद्ध उत्साह आणि चांगल्या फॉर्मसह खेळण्यासाठी खेळाडू सज्ज आहेत. वर्षभर अनेक सामने खेळायचे असल्याने संपूर्ण मोसम व्यस्त आहे. या स्थितीत मानसिकरीत्या कुठला खेळाडू कणखर वृत्तीचा आणि कुठला खेळाडू कचखाऊ वृत्तीचा आहे, हे मोसमाच्या अखेरपर्यंत कळून चुकेल. (पीएमजी)
केनला बाद करणे, विजयाचे दार उघडण्यासारखेच!
By admin | Published: September 22, 2016 5:44 AM