मिरपूर : बागंलादेशाविरुद्धच्या वन-डे सामन्यांच्या मालिकेत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर टीकेचे लक्ष्य ठरलेल्या महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपद सोडण्याचा प्रस्ताव ठेवला आहे; पण माजी खेळाडूंनी मात्र या निर्णयाला विरोध केला आहे. रविवारी बांगलादेशाविरुद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्यानंतर धोनीने पत्रकार परिषदेत भारतीय क्रिकेटच्या यशासाठी कर्णधारपद सोडण्याची आणि खेळाडू म्हणून योगदान देण्याची तयारी असल्याचे त्याने म्हटले होते. माजी कर्णधार बिशनसिंग बेदी, दिलीप वेंगसरकर व अजित वाडेकर आणि माजी क्रिकेटपटू चेतन चौहान, चंदू बोर्डे, सैयद किरमाणी व किरण मोरे यांनी धोनीचे समर्थन केले. भारतीय क्रिकेटवर सडेतोड मत व्यक्त करणारे बिशनसिंग बेदी बांगलादेशाविरुद्ध संघाच्या निराशाजनक कामगिरीसाठी एकट्या धोनीला जबाबदार मानीत नाहीत.बेदी म्हणाले, ‘‘मी कोणा एका खेळाडूला दोष देणार नाही. भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळे मालिका गमवावी लागली. धोनीच्या कर्णधारपदाबाबत अधिक काही बोलणार नाही. आत्ताच सर्व काही स्पष्ट झालेले नाही. धोनीने निराशेमुळे मीडियामध्ये असे मत व्यक्त केले असावे. ज्या वेळी संघ जिंकत असतो, त्या वेळी कर्णधाराची प्रशंसा होते, तर पराभवामुळे टीका होते. धोनीने यापूर्वी कसोटी कर्णधारपद सोडलेले आहे. वन-डेबाबत काही कल्पना नाही. मी प्रथमच त्याला निराश होताना बघितले व हे चांगले संकेत नाहीत.’’
कॅप्टन कूलचा इशारा!
By admin | Published: June 23, 2015 1:52 AM