पुणे : कर्णधार म्हणून धोनीची कारकीर्द फारच यशस्वी ठरली. या काळात संघातील प्रत्येक सिनियर खेळाडूला त्याने सन्मानाची वागणूक दिली हा त्याच्यातील ‘उत्कृष्ट नेतृत्व’ गुण म्हणावा लागेल, अशा शब्दात भारतीय संघाचे मुख्य कोच अनिल कुंबळे यांनी धोनीचे कौतुक केले.२००८ मध्ये आॅस्ट्रेलिया विरुद्ध मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेनंतर कुंबळे यांनी निवृत्ती जाहीर केली तेव्हा ते संघाचे कर्णधार होते. त्यानंतर संघाचे नेतृत्व धोनीकडे आले. धोनी लवकरच तिन्ही प्रकारात देशाचा कर्णधार कसा बनला, या आठवणींना कुंबळे यांनी उजाळा दिला.ते म्हणाले, ‘मी नेतृत्व सोडले त्यावेळी एमएस हे पद सांभाळू शकतो, असा विश्वास निवडकर्त्यांना दिला होता. धोनी कसोटी कर्णधार बनण्यास सज्ज दिसला. सुरुवातीला २००७ च्या टी-२० विश्वचकात कर्णधार या नात्याने देशासाठी मोठी कामगिरी बजावली होती. तेव्हापासून २००७ ते २०१७ हा दहा वर्षांचा त्याचा प्रवास वैभवशाली ठरला. कर्णधार या नात्याने त्याच्यातील क्षमता अनेकांनी पाहिली. अनेक जुने चेहरे निवृत्त झाले होते. काही शिल्लक होते. नव्या दमाचे खेळाडू संघात दाखल झाले. पण धोनीने सर्वांना सन्मान दिला. प्रत्येकाची क्षमता ओळखून संधी दिली. माहीने कौशल्य क्षमतेच्या बळावर संघात एकोपा राखला.खेळाडूकडून चांगली कामगिरी करून घेण्यात आणि संघाला जे हवे आहे ते मिळवून देण्यात धोनी सर्व आघाड्यांवर यशस्वी ठरला. धोनीच्या नेतृत्वात भारत कसोटी क्रिकेटमध्ये नंबर वन बनला. वन डे विश्वचषक विजेता बनला, शिवाय चॅम्पियन्स ट्रॉफीचादेखील चॅम्पियन ठरला. याशिवाय अनेक अविस्मरणीय विजयांची नोंद धोनीच्या नेतृत्वात झाली. सचिन, सौरभ, लक्ष्मण, सेहवाग आणि राहुल द्रविड हे दिग्गज त्यावेळी धोनीच्याच नेतृत्वात खेळले, हे विशेष. इतके सिनियर्स संघात असताना नेतृत्व करणे सोपे नसते. माहीने मात्र या सर्वांचाच चाणाक्षपणे उपयोग करून घेतला. निवृत्तीची योग्य वेळ निवडल्याबद्दल कुंबळे यांनी धोनीचे तोंडभरून कौतुक केले. (वृत्तसंस्था)सध्याच्या संघातील युवराजचा अपवाद वगळता सर्वांचे करियर धोनीच्या नेतृत्वात सुरू झाले. माहीने कर्णधार म्हणून सर्वकाही मिळविले आहे. खेळाडू म्हणून तो संघात असल्याने त्याच्या अनुभवाचा इतरांना लाभ होईलच. विराटलादेखील कर्णधार या नात्याने माहीच्या अनुभवाचा लाभ होणार आहे. - अनिल कुंबळे
‘कर्णधार’ धोनीने सीनियर्सना सन्मान दिला
By admin | Published: January 13, 2017 1:16 AM