ऑनलाइन लोकमत
रांची, दि. 18 - लंचनंतर कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य राहाणे यांच्या रुपाने भारताला दोन धक्के बसले. कोहली (6) आणि राहाणे (14) दोघे स्वस्तात बाद झाले. चेतेश्वर पूजारा शतकाच्या जवळ असून त्याने एक बाजू लावून धरली आहे. कोहली आणि राहाणे दोघान कमिन्सने बाद केले. भारताच्या 4 बाद 276 धावा झाल्या आहेत.
तिस-या दिवसाच्या खेळाला सावध, संयमी सुरुवात करणा-या भारताला मुरली विजयच्या रुपाने दुसरा धक्का बसला. एक बाजू लावून धरणारा विजय (82) धावांवर यष्टीचीत झाला. लंचला खेळ थांबला तेव्हा भारताच्या दोन बाद 193 धावा झाल्या होत्या. कालच्या 1 बाद 120 वरुन डाव पुढे सुरु केल्यानंतर चेतेश्वर पूजारा नाबाद (40) आणि मुरली विजय (82) यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना यश मिळणार नाही याची काळजी घेतली होती. विजयने आज सकाळी अर्धशतक पूर्ण केले.
सलामीवीर लोकश राहुल काल (67) धावांवर बाद झाला. भारताच्या दोन बाद 193 धावा झाल्या आहेत. पहिल्या डावातील ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी भारताला अजूनही 260 पेक्षा जास्त धावांची आवश्यकता आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 451 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाला मात देण्यासाठी पहिल्या दोन कसोटी सामन्यात फिरकी गोलंदाजीला अनुकूल खेळपट्ट्या बनवण्यात आल्यामुळे दोन्ही संघांना एकाही डावात तीनशेचा टप्पा गाठता आला नव्हता. मात्र, रांचीत सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीत मात्र आॅस्ट्रेलियाने पहिल्यांदाच चारशे पार धावसंख्या उभारली.
‘गरज भासली तरच कोहलीने फलंदाजी करावी’
भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी कोहलीला जोखीम न पत्करण्याचा सल्ला दिला आहे. जर गरज भासली तरच त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाजी करावी, असे गावस्कर यांनी म्हटले आहे.