>> अमेय गोगटे
आयुष्यात आपल्याला काय करायचंय, कुठे पोहोचायचंय, हे माहीत असलं की ते ध्येय आपण गाठू शकतो. कारण, आपण त्या ध्येयाच्या दिशेने चालत राहतो, प्रयत्न करत राहतो. कधी धडपडतो, अडखळतो, पण थांबत नाही, असे मोलाचे बोल पूर्वी घरातली ज्येष्ठ मंडळी सांगायची. हेच 'बोल' आता मोटिव्हेशनल स्पीकर ('मोल' घेऊन) सांगतात. 'माना की मुश्कील है सफर, पर सून ओ मुसाफिर', या इन्स्पायरिंग साँगवाल्या रिलमध्येही असाच काहीसा मेसेज असतो. पण, हे ध्येय ठरवणं, गोल सेट करणं सोपं काम नाही आणि म्हणूनच बहुतेकांना ते जमत नाही. अशावेळी, अत्यंत 'स्मार्ट', पण तितकीच 'कन्फ्यूज' मानल्या जाणाऱ्या 'जेन झी'मधल्या एका २१ वर्षाच्या पोरानं परवा आपलं ध्येय सांगून जगाला अवाक् केलं. तो पोरगा म्हणजे, यंदाचा विम्बल्डन विजेता कार्लोस अल्कराज.
“I don’t know my limit. But at the end of my career I want to sit at the same table as the big guys. That’s my main goal. That’s my dream right now.”, असं कार्लोस अल्कराजनं जाहीरपणे सांगितलंय. अल्कराजला ज्या 'टेबल'मध्ये जाऊन बसायचंय, तिथे जे दिग्गज सध्या विराजमान आहेत, त्यांची नावं वाचली, तर अल्कराजचं स्वप्न किती मोठं आहे याचा अंदाज येईल. रॉड लेव्हर, बियाँ बोर्ग, जॉन मेकॅन्रो, बोरिस बेकर, पीट सॅम्प्रस, रॉजर फेडरर, राफा नदाल, नोवाक जोकोविच या सार्वकालीन महान टेनिसपटूंच्या पंगतीत अल्कराजला जाऊन बसायचं आहे. आता काही जणांना हा ओव्हर कॉन्फिडन्स वाटू शकतो किंवा वाहवा मिळवण्यासाठी फेकलेलं वाक्यही. पण, विम्बल्डन ट्रॉफी जिंकणं हे माझं स्वप्न आहे, असं ११ व्या वर्षी सांगणाऱ्या अल्कराजने २०व्या वर्षी या अत्यंंत प्रतिष्ठेच्या ट्रॉफीवर नाव कोरून दाखवलं, यावरून तो त्याची स्वप्नं किती गांभीर्याने घेतोय, हे सहज लक्षात येईल. आपण जे ध्येय ठरवलं आहे, ते किती कठीण आहे आणि त्यासाठी सर्वस्व पणाला लावावं लागेल, याचीही जाणीव त्याला असेलच. तरीही, ते जगाला सांगून त्यानं एक मोठं आव्हानच स्वीकारलं आहे.
स्पेनचा कार्लोस अल्कराज गार्फिया टेनिसच्या नभांगणातील 'उगवता तारा' मानला जातोय. गेल्या २० वर्षांमध्ये (२००४ मधील ऑस्ट्रेलियन ओपन ते २०२४ मधील विम्बल्डन) ८२ ग्रँडस्लॅम स्पर्धा झाल्या. त्यातील ६५ जेतेपदं ही केवळ तिघांच्या नावावर आहेत. ते त्रिकूट म्हणजे अर्थातच - फेडरर (१९ (एकूण २० जेतेपदं, पण एक जेतेपद २००३ मधील)), नदाल २२ आणि जोकोविच २४. या काळात अँडी मरे आणि स्टॅन वॉवरिंका यांनी प्रत्येकी तीन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या. त्याशिवाय, गॅस्टोन गौडिओ, मरात साफीन, डेल पोट्रो, मारिन सिलिच, डॉमिनिक थीम, डेनिल मेदवेदेव, जेन्निक सिन्नर यांच्या नावावर एकेक 'ग्रँडस्लॅम' जमा आहे. स्वाभाविकच, सातत्यपूर्ण कामगिरी करू शकणारा, वेगवेगळ्या कोर्ट्सवर जिंकण्याची क्षमता असणारा, गुणी आणि प्रतिभावान टेनिसपटूचा शोध बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. फेडरर निवृत्त झाला. नदालच्या दुखापतींनी पुन्हा डोकं वर काढलं. त्या दरम्यान, काही नवे तारे एटीपी स्पर्धांमध्ये लुकलुकले, पण 'ग्रँडस्लॅम'मध्ये जोकोविच नावाच्या 'ध्रुवताऱ्या'पुढे त्याचं फार काही चाललं नाही. थीम, मेदवेदेव, अलेक्झांडर झ्वेरेव, स्टेफानोस सित्सिपास, अँड्रे रुब्लेव, कॅस्पर रूड हे त्यापैकीच काही. सध्या अव्वल स्थानी असलेला जेन्निक सिन्नरने त्याच्यातला 'स्पार्क' दाखवला आहे. हे सगळेच शिलेदार सध्या २५-२६ वर्षांचे आहेत. त्यामुळे स्वतःला 'इम्प्रूव्ह' करून 'प्रूव्ह' करण्याची संधी त्यांच्याकडे आहे. पण, सध्या तरी कार्लोस अल्कराजने आपला दबदबा निर्माण केलाय.
विशी-एकविशीत चार ग्रँडस्लॅम जिंकण्याची किमया फक्त चौघांना जमली आहे. या चौकडीत मॅट्स विलँडर, बोर्ग, बेकर यांच्यासोबत आता अल्कराजचं स्थान आहे. त्यातही, या चारपैकी दोन जेतेपदं त्यानं 'द' जोकोविचला हरवून पटकावली आहेत, हे विशेष.
गेल्या वर्षी तो कारकिर्दीत पहिल्यांदा विम्बल्डन जिंकला. त्याचं स्वप्न होतं ते. स्वाभाविकच, ती ट्रॉफी त्याच्यासाठी स्पेशल आहे. पण, यंदाचा विम्बल्डन विजय त्याला वेगळ्या उंचीवर घेऊन गेलाय. फ्रेंच ओपनच्या क्ले कोर्टवर जिंकणं आणि पाठोपाठ विम्बल्डनच्या ग्रास कोर्टवर जिंकणं, हा भीमपराक्रम मानला जातो. कारण, दोन्ही सरफेस परस्परविरुद्ध आहेत. एक अगदी संथ, दुसरा तितकाच वेगवान. फ्रेंच ओपन संपल्यावर फक्त तीन आठवड्यांनी विम्बल्डन स्पर्धा सुरू होते. त्यामुळे चेंडूच्या वेगाचं गणित जमवणं, 'वेदर'शी जुळवून घेणं अत्यंत कठीण असतं. म्हणूनच, एकाच वर्षात या दोन स्पर्धा जिंकणं (याला 'चॅनल स्लॅम' म्हणतात) आजवर केवळ पाच टेनिसवीरांना जमलं होतं. रॉड लेव्हर, बोर्ग, नदाल, फेडरर आणि जोकोविच. आता या यादीत अल्कराजही विराजमान झालाय.
जोकोविचला तीन सेटमध्ये हरवणं खायचं काम नाही राव! प्रतिस्पर्ध्याला तो पळवून-पळवून, दमवून-दमवून हरवतो. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तो 'कट्टर' आहे. गुडघा दुखत असताना, सर्जरी झाली असतानाही तो विम्बल्डन खेळायला उतरला आणि नुसताच उतरला नाही, तर दुखत्या गुडघ्यानेही त्याने सहा प्रतिस्पर्ध्यांना गुडघे टेकायला लावले. पण, अल्कराजनं त्याला अजिबात संधी दिली नाही. सर्व्हिस, व्हॉली, बेसलाईन, ड्रॉप शॉट्स असा परिपूर्ण खेळ करून त्यानं आपला 'दर्जा' दाखवून दिला.
क्ले आणि ग्रास कोर्टसोबतच यूएस ओपनच्या हार्ड कोर्टवरही अल्कराजने आपला करिष्मा दाखवला आहे. खरं तर, २०२२ मध्ये तिथेच त्यानं ग्रँडस्लॅमची 'बोहनी' केली होती. आता ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये त्याला खातं उघडायचं आहे. एटीपीच्या महत्त्वाच्या १५ स्पर्धा त्यानं जिंकल्यात आणि त्याची कामगिरी सातत्यानं उंचावतेय. गरज आहे ती सातत्य आणि फिटनेस टिकवून ठेवण्याची.
तीन दिग्गज टेनिसवीरांची झलक कार्लोस अल्कराजमध्ये दिसते, असं बरेच जण म्हणतात. जोकोविचचा माईंड गेम आणि चिवटपणा त्याने अंगी भिनवला आहे. स्पेनचा असल्यानं लढवय्येपणा रक्तात होताच; त्यात नदालसारखाच स्टॅमिना आणि पॉवर कार्लोसमध्ये दिसते. 'एलिगन्स' आणि 'टेम्परामेंट' ही फेडररची गुणवैशिष्ट्यंही तो आत्मसात करतोय. अर्थातच, टेनिसमधली ही त्रिमूर्ती कालपरत्वे जशी प्रगल्भ होत गेली, त्यांचा खेळ जसा बहरत गेला, त्यांना जसं वलय प्राप्त झालं, तिथे पोहोचण्यासाठी कार्लोसला अखंड साधना करावी लागेल आणि तशी त्याची तयारीही दिसतेय.
विम्बल्डनची दुसरी लखलखती ट्रॉफी हातात असताना, 'मी अजून स्वतःला चॅम्पियन समजत नाही', असं तो प्रांजळपणे म्हणाला. याचा अर्थ 'चॅम्पियन' होण्यासाठी किती मोठं कर्तृत्व असायला हवं, हे तो ओळखून आहे. तुला किती ग्रँडस्लॅम जिंकायची आहेत, या प्रश्नावर आकडा न सांगता, महान खेळाडूंच्या मांदियाळीत जायचं आपलं ध्येय तो बोलून दाखवतो आणि आज आपण जे काही आहोत ते आपल्या कुटुंबामुळेच आहोत अशी कृतज्ञता व्यक्त करतो, यातून त्याची जडणघडण लक्षात येते. आर्थिक परिस्थितीमुळे टेनिसमध्ये करिअर करणं कार्लोसच्या वडिलांना जमलं नव्हतं. पण, त्यांनी आपल्या लेकाला टेनिसचे धडेही दिले आणि एक स्वप्नही. ते कार्लोसच्या डोळ्यात स्पष्ट दिसतं.
'स्वप्नांचा पाठलाग करा, ती साकार होतात', असं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कायम म्हणतो. कार्लोसमध्ये बहुतेक त्याला स्वप्नांचा पाठलाग करणारा मुलगा दिसतोय. म्हणूनच, या मुलानं विम्बल्डन जिंकल्यानंतर, 'अब से टेनिस पे एक ही राज करेगा, वो है अल्कराज', अशी दाद सचिननं दिलीय. "I don’t know my limit" असं म्हणणाऱ्या अल्कराजने "Sky is the limit" मानून ग्रँडस्लॅमला गवसणी घालत राहावं, याच शुभेच्छा!