मुंबई : के. पी. बी. हिंदुजा महाविद्यालयाने आयोजित केलेल्या तेराव्या आंतर महाविद्यालय रोख पारितोषिकांच्या कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी, महिला एकेरी गटामध्ये अनुक्रमे विरारच्या विवा महाविद्यालयाचा महेश रायकर व डोंबिवलीच्या मॉडल महाविद्यालयाची चैताली सुवारे यांनी विजेतेपद पटकाविले. ही प्रतिष्ठित आंतर महाविद्यालय कॅरम स्पर्धा श्रीमती पी. डी. हिंदुजा ट्रस्टतर्फे के. पी. बी. हिंदुजा वाणिज्य महाविद्यालय यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आली. या स्पर्धेला मुंबई, ठाणे, पालघरच्या कानाकोपऱ्यातून ३०० युवा खेळाडूंचा सहभाग लाभला. अंतीम फेरीच्या रंगतदार तीन गेम रंगलेल्या रोमहर्षक लढतीत विवा महाविद्यालयाचा तिसरा मानांकित महेश रायकरने आपल्यापेक्षा अनुभवी मिठीबाई महाविद्यालयाचा गतविजेता अग्रमानांकित ओमकार टिळकचा २५-४, १३-२५, २५-११ असा पराभव करून स्पर्धेत मोठी खळबळ माजवत विजेतेपदाचा मानकरी ठरला.
पहिल्या गेममध्ये अप्रतिम शॉटस् व आक्रमक खेळ करत महेश रायकरने पाचव्या बोर्डपर्यंत १७-४ अशी अशी आघाडी घेत सहाव्या बोर्डमध्ये ८ गुण मिळवून २५-४ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये ओमकार टिळकने ७-७ अशी बरोबरी केली. नंतरच्या दोन बोर्डात ८ आणि ९ गुण मिळवून २५-१३ असा जिंकून १-१ ने बरोबरी साधली. नंतरच्या तिसऱ्या निर्णायक गेममध्ये महेश रायकर शांत चित्ताने खेळत बचावात्मक खेळाचे व आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत ४ बोर्डापर्यंत १८-९ अशी आघाडी घेतली. नंतरच्या तीन बोर्डात ६ आणि १ गुण मिळवून २५-११ असा तिसरा गेम जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात पाटकर महाविद्यालयाच्या शशांक शिरोडकरने दोन गेम रंगलेल्या एकतर्फी सरळ लढतीत सिद्धार्थ महाविद्यालयाच्या ध्रुव जाधवचा २५-९, २५-६ असा पराभव करून तिसरे स्थान पटकावले.तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मिठीबाई महाविद्यालयाच्या ओमकार टिळकने तीन गेम रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात सिद्धार्थ महाविद्यालयाच्या ध्रुव जाधवचा २५-५, ११-२५, २५-० असा पराभव करून अंतीम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विवा महाविद्यालयाच्या महेश रायकरने अत्यंत आक्रमक खेळाचे व अप्रतिम शॉटस्चे प्रदर्शन करत पाटकर महाविद्यालयाच्या शशांक शिरोडकरचा १४-२५, २५-१२, २५-१० असा तीन गेम रंगलेल्या चुरशीच्या उत्कंठापूर्ण सामन्यात पराभूत करून अंतीम फेरी गाठली.
महिला एकेरीमध्ये बिनमानांकित डोंबिवलीच्या मॉडल महाविद्यालयाच्या चैताली सुवारेने अत्यंत आक्रमक व बचावात्मक खेळाचे मिश्रण करत अग्रमानांकित आर. ए. पोतदार महाविद्यालयाच्या सोनल सावंतचा दोन गेम रंगलेल्या उत्कंठापूर्ण चुरशीच्या लढतीत २५-१०, २५-१८ असे नमवून सर्वांना आश्चर्याचा धक्का देत आपले वर्चस्व सिद्ध करून विजेतेपदावर आपले नाव कोरले.
तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मॉडल महाविद्यालयाच्या चैताली सुवारेने दोन गेम रंगलेल्या एकतर्फी लढतीत डी. जी. रुपारेल महाविद्यालयाच्या दिक्षा नायकवर २५-३, २५-० अशी मात करत अंतीम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात आर. ए. पोतदार महाविद्यालयाच्या सोनल सावंतने के. ई. एस. श्रॉफ महाविद्यालयाच्या प्रणाली शहाचा दोन गेम रंगलेल्या सामन्यात २५-१४, २५-३ अशी मात करत अंतीम फेरी गाठली.