मुंबई: महाराष्ट्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या शिवछत्रपती पुरस्कारासाठी पात्र क्रीडा प्रकारांच्या यादीतून कॅरम खेळाला वगळल्याने संताप व्यक्त केला जात आहे. कॅरमसह शरीरसौष्ठव, बिलियर्डस-स्नूकर, अश्वारोहण, गोल्फ, आदी खेळांना देखील यात स्थान मिळाले नाही. कॅरम खेळाची बाजू मांडण्यासाठी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनची १४ ऑगस्ट १९५४ रोजी स्थापना झाली. तेव्हापासून ही संस्था या खेळाला न्याय देण्यासाठी लढा देत आली आहे. भारतीयांनी क्रिकेटपेक्षा जास्त कोणत्याच खेळावर प्रेम केलं नाही. क्रिकेट म्हणजे भारतात जणू काही एक धर्मच... या धर्माचे कोट्यवधी चाहते आहेत. पण, कॅरम हा खेळ देखील मागे नसून महाराष्ट्राने आतापर्यंत ३ वर्ल्ड चॅम्पियन, सुमारे ३० आंतरराष्ट्रीय चॅम्पियन खेळाडू, १५ पुरुष आणि महिला वरिष्ठ राष्ट्रीय चॅम्पियन, १२ पुरुष आणि महिला वेटरन नॅशनल चॅम्पियन, ३० कॅडेट, सब-ज्युनियर, ज्युनियर आणि यूथ नॅशनल चॅम्पियन तसेच सुमारे २५ शिवछत्रपती पुरस्कार विजेते शिलेदार तयार केले आहेत. तसेच आगामी काळात देखील महाराष्ट्राचा डंका देशभर पोहचवतील अशा खेळाडूंची भर पडणार आहे. याशिवाय महाराष्ट्राने जवळपास ४० आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पंच तयार केले आहेत.
महाराष्ट्र सरकारचा निर्णय महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने मागील आठ वर्षांत आंतरराष्ट्रीय स्पर्धांसह सुमारे १२ राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धा प्रत्येक क्रीडा वर्षात आयोजित केल्या आहेत. MCA ने २०१३ मध्ये आपली वेबसाईट लॉन्च केली. अधिकाधिक प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्याद्वारे हळूहळू या खेळाचे महत्त्व पटवून देण्यासाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी समालोचनासह सामन्यांचा थेट प्रवाह सुरू करण्यात आला. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने युट्यूब चॅनलच्या माध्यमातून चाहत्यांना या खेळाशी जोडण्याचा प्रयत्न केला. देशासाठी सर्वोत्कृष्ट खेळाडू तयार करणे हे या असोसिएशनचे प्रमुख ध्येय आहे.
महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सचिव अरुण केदार यांनी यांनी कॅरम आणि खेळाडूंच्या सर्वांगीण हिताच्या विरोधात असलेल्या या चुकीच्या निर्णयाचा तीव्र शब्दांत निषेध केला. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाच्या या चुकीच्या निर्णयामुळे सध्याचे जागतिक विजेते संदीप दिवे, जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेले निलम घोडके आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू अभिजीत त्रिपाणकर यांना २०२३-२४ या वर्षाच्या या प्रतिष्ठेच्या पुरस्कारापासून वंचित राहावे लागणार आहे. कॅरम खेळाच्या दृष्टीने हे अजिबात चांगले नाही. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने प्रत्येक कॅरम खेळाडू, अधिकारी, पंच आणि कॅरमप्रेमींना विनंती करतो की, त्यांनी न्याय मिळवण्यासाठी योग्य पद्धतीने आणि योग्य व्यासपीठावर लढा द्यावा आणि आपला निषेध नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.
महाराष्ट्र कॅरम असोसिएशनकडून निषेध दरम्यान, आपले खेळाडू आपल्या देशाचा गौरव करण्यासाठी आपले सर्वस्व देत आहेत आणि दुसरीकडे खेळाडूंना सरकार स्तरावरून अशी वागणूक मिळत आहे. हे कृत्य केवळ आपल्या राज्याच्या क्रीडा संस्कृतीलाच हानिकारक नाही तर आपल्या खेळाडूंच्या मनोधैर्यावरही परिणाम करणारे आहे. खेळाडूंवर अन्याय करणाऱ्या अशा कृत्याचा आम्ही निषेध करतो. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाविरोधात आम्ही लढणार असून, माघार न घेणार नाही, असेही महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या सचिवांनी सांगितले.