मुंबई : पालघर डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशनतर्फे आयोजित प्रतिष्ठेच्या पालघर डिस्ट्रीक्ट कॅरम स्पर्धेत अनुक्रमे पुरुष एकेरी व प्रौढ गट एकेरी गटात तिसरा मानांकित नालासोपाऱ्याचा शरीफ शेख व यंगस्टार्स ट्रस्टचा अग्रमानांकित नवीन पाटील यांनी विजेतेपद पटकावले.
पुरुष एकेरीच्या अंतीम स्पर्धेच्या सामन्यात नालासोपाऱ्याच्या शरीफ शेखने यंगस्टार्स ट्रस्टच्या बिनमानांकित महेश रायकरविरूद्ध पहिल्या गेममध्ये पाच बोर्डामध्ये १६-५ असे आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत ८, ४, ४, ९ असे गुण मिळवून २५-७ असा पहिला गेम जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्ये महेश रायकरने ४-१३ असे पिछाडीवर असताना आक्रमक व बचावात्मक खेळाचे प्रदर्शन करत नंतरचे ५ बोर्ड सलग २५-१३ असा जिंकून १-१ ने बरोबरी केली.
शरीख शेख निर्णायक तिसऱ्या गेममध्ये ४ बोर्डापर्यंत ११-९ असा आघाडीवर होता. नंतरच्या तीन बोर्डात आक्रमक व बचावात्मक खेळाचे प्रात्यक्षिक घडवित शरीफ शेखने ७ आणि १० गुण घेऊन २५-१३ तिसरा गेम जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात यंगस्टार्स ट्रस्टच्या आशुतोष गिरीचा सरळ दोन गेममध्ये २५-१७, २५-११ अशी मात करत निष्प्रभ केले. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात यंगस्टार्स ट्रस्टच्या महेश रायकरने अटीतटीच्या दोन गेम रंगलेल्या लढतीत माजी पालघर जिल्हा विजेता राजेश मेहताला २५-१६, २५-१० असे निष्प्रभ करत स्पर्धेत मोठी खळबळ माजवत अंतीम फेरी गाठली. एका महत्त्वपूर्ण उप-उपांत्य फेीच्या सामन्यात बिनमानांकित महेश रायकरने तीन गेम रंगलेल्या रंगतदार लढतीत चौथा मानांकित विश्वनाथ देवरूखकरचा २५-१५, १-२५, २५-१२ असा संघर्षपूर्ण विजय मिळवित स्पर्धेत मोठी खळबळ माजवली.
पुरुष प्रौढ एकेरीच्या अंतीम फेरीत यंगस्टार्स ट्रस्टच्या अग्रमानांकित नवीन पाटीलने तीन गेम रंगलेल्या रोमहर्षक लढतीत दुसऱ्या मानांकित वसई क्रिडा मंडळाच्या गणेश फडकेचा २५-६, १४-२५, २५-१३ असा संघर्षपूर्ण विजय मिळवित विजेतेपदावर आपले नाव कोरले. विजेता नवीन पाटीलला रोख रुपये २०००/- व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. उपविजेता गणेश फडकेला रोख रुपये १०००/- व प्रमाणपत्र यावर समाधान मानावे लागले.
तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अग्रमानांकित नवीन पाटीलने दोन गेम रंगलेल्या लढतीत यंगस्टार्स ट्रस्टच्या दत्तू गड्डमचा २५-९, २५-० असा फाडशा पाडत अंतीम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दुसऱ्या मानांकित गणेश फडकेने यंगस्टार्स ट्रस्टच्या अंकुश बायजेला २५-२०, २५-७ असे नमवून अंतीम फेरीत प्रवेश मिळविला. चार दिवस खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये अनुक्रमे विश्वनाथ देवरूखकर, नवीन पाटील व आशुतोष गिरी यांनी प्रत्येकी एक ब्रेक टू फिनिश व नरेश कोळी याने एक ब्लॅक टू फिनिश नोंदविले.