नवी दिल्ली : आगामी आॅक्टोबर महिन्यापासून होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दीर्घ क्रिकेट मालिकेसाठी भारताने कसून तयारी सुरु केली आहे. त्याचवेळी २९ सप्टेंबरला होणाऱ्या एकमात्र टी-२० सराव सामन्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारत ‘अ’ संघाची निवड केली असून यामध्ये आयपीएलमध्ये चमकलेल्या युजवेंद्र चहल, पवन नेगी आणि हार्दिक पांड्या या नवोदितांची वर्णी लागली आहे. राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारत ‘अ’ संघाची निवड झाली आहे. विशेष म्हणजे संघ जरी निवडण्यात आला असला तरी या संघाचा कर्णधार कोण? हे मात्र अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.बारा खेळाडूंचा समावेश असलेल्या या संघातील बहुतेक खेळाडू यापुर्वी भारत ‘अ’ स्तरावर खेळले आहेत. याव्यतिरीक्त आयपीएल २०१५ मध्ये चमकलेले युजवेंद्र चहल (आरसीबी), पवन नेगी (सीएसके) आणि हार्दिक पांड्या (मुंबई इंडियन्स) हे युवा खेळाडू संघात नवे चेहरे आहेत. त्यामुळे यांच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल.एकूणच संघातील खेळाडूंवर नजर टाकल्यास निवडलेला भारतीय ‘अ’ संघातील खेळाडूंचे सरासरी वय २५ वर्ष आहे. तसेच २७ वर्षांचा रेल्वेचा वेगवान गोलंदाज अनुरीत सिंग हा संघातील सर्वात वयस्क खेळाडू आहे. तर कोलकाता नाइट रायडर्सचा चायनामेन गोलंदाज कुलदीप यादव सर्वात युवा खेळाडू आहे. २३ वर्षांखालील भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि टी-२० स्पेशालीस्ट सुर्यकुमार यादवचा संघात समावेश करण्यात आला असून भारत ‘अ’ कडून सातत्याने चमकदार कामगिरी करणारा मयांक अग्रवालची निवड देखील निश्चित मानली जात होती.त्याचवेळी पंजाबच्या मनन वोहराच्या निवडीने सर्वांनाच आश्चर्याच धक्का बसला आहे. देशांतर्गत स्पर्धेत आणि आयपीएलमध्ये पंजाबकडून खेळणाऱ्या मननने म्हणावी तशी कामगिरी केली नसल्याने त्याच्या निवडीने सर्वांचे लक्ष वेधले. (वृत्तसंस्था)
चहल, नेगी, पांड्या भारत ‘अ’ संघात
By admin | Published: September 23, 2015 11:14 PM