गुवाहाटी : रिओ आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवणाऱ्या चैन सिंगने १२ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये पुन्हा एकदा छाप सोडली आणि सहावे सुवर्ण पदक पटकाविले. भारताने या स्पर्धेत आपले वर्चस्व कायम राखताना पदकतालिकेत अन्य प्रतिस्पर्ध्यांना मोठ्या फरकाने पिछाडीवर सोडले. नवव्या दिवशी भारताने एकूण २७५ पदकांसह (१६० सुवर्ण, ८८ रौप्य आणि २१ कांस्य) अव्वल स्थान कायम राखले. श्रीलंका एकूण १६७ पदकांसह (२५ सुवर्ण, ५६ रौप्य, ८५ कांस्य) दुसऱ्या तर पाकिस्तान एकूण ८१ पदकांसह (९ सुवर्ण, २७ रौप्य आणि ४५ कांस्य) तिसऱ्या स्थानी आहे. रविवारी मिश्र रिले सांघिक स्पर्धेत (३०० मीटर जलतरण, ६० किलोमीटर सायकलिंग आणि १.२ किलोमीटर दौड) भारताने सुवर्ण पदक पटकाविले. नेपाळ रौप्य, तर श्रीलंका कांस्य पदकाचा मानकरी ठरला. ट्रायथलॉन : भारताला तीन सुवर्णयजमान भारताने १२ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत कामगिरीत सातत्य राखताना ट्रायथलॉनमध्ये तीन सुवर्णपदकांची कमाई केली. भारतीय खेळाडूंनी शनिवारी पुरुष व महिला विभागात वैयक्तिक सुवर्णपदकाचा मान मिळवल्यानंतर रविवारी मिश्र रिलेमध्येही सुवर्णपदकावर नाव कोरले. पल्लवी रेतिवाल, दिलीप कुमार, सरोजनीदेवी थोउबम आणि धीरज सावंत यांनी मिश्र रिलेमध्ये भारताला सुवर्णपदक पटकावून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पल्लवी व दिलीप यांनी अनुक्रमे महिला व पुरुष स्पर्धांमध्ये वैयक्तिक सुवर्णपदकाचा मान मिळवला आहे.पुरुषांच्या वैयक्तिक स्पर्धेत रौप्यपदक भारताच्या गुरू दत्तने तर कांस्यपदक श्रीलंकेच्या नुवान कुमारा याने पटकावले. महिलांच्या वैयक्तिक स्पर्धेत रौप्यपदक भारताच्या पूजा चारुषीने, तर कांस्यपदक नेपाळच्या रोजा केसी हिने पटकावले. भारताचे दोन्ही कबड्डी संघ अंतिम फेरीत दाखलभारताच्या पुरुष महिला या दोन्ही संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताच्या महिलांनी नेपाळला ४५-१५ असे पराभूत केले. मध्यंतराला भारताकडे २५-०५ अशी भक्कम आघाडी होती. कुमारीच्या अष्टपैलू खेळ त्याला स्नेहल शिंदे, पायल चौधरी, व प्रियंकाची मिळालेली महत्वाची साथ त्यामुळे हा मोठा विजय मिळाला. अंतिम फेरीत भारताच्या महिलांची लढत बांगला देश संघाशी होईल. भारताच्या पुरुषांनी उपांत्य बांगला देशला २९-९ असे सहज नामवित अंतिम फेरीत धडक दिली. मध्यंतराला भारताकडे १५-३ अशी महत्वपूर्ण आघाडी होती. बाजीराव शेडगे, सुरजित यांचा भक्कम बचाव त्याला अनुपकुमार, रोहित कुमार, यांची मिळालेली आक्रमक चढाईची साथ यामुळे हे शक्य झाले. अंतिम फेरीत भारताची गाठ पाकिस्तान व श्रीलंका यातील विजेत्या संघाची होईल.नेमबाजी : चैन सिंगला तिसरे सुवर्णरिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या चैन सिंगने १२ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत छाप सोडली. त्याने रविवारी पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये अव्वल स्थान पटकावताना वैयक्तिक तिसऱ्या सुवर्णपदकाला गवसणी घातली. नेमबाजीमध्ये रविवारी केवळ दोन सुवर्णपदकांचा निकाल लागणार होता आणि भारताने ही दोन्ही पदके पटकावताना क्लीन स्वीपच्या दिशेने आगेकूच केली. भारताने पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये सांघिक स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले. २६ वर्षीय चैनने ४५३.३ चा स्कोअर नोंदवत सुवर्णपदक पटकावले. त्याने पुन्हा एकदा त्याचा सिनिअर सहकारी व रिओ आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवणाऱ्या गगन नारंगला पिछाडीवर सोडले. नारंगला ४५०.३ च्या स्कोअरसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. श्रीलंकेचा एसएमएम समरकून कांस्यपदकाचा मानकरी ठरला. चैनने यापूर्वी ५० मीटर रायफल प्रोन व १० मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. चैनने एकूण सहा सुवर्णपदके पटकावली. कारण तीन सांघिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या भारतीय संघांमध्ये चैनचा समावेश होता. लंडन आॅलिम्पिकमध्ये कांस्यपदकाचा मानकरी ठरलेला नारंग तीन रायफल स्पर्धांमध्ये सांघिक जेतेपद पटकावणाऱ्या संघाचा सदस्य आहे. पण वैयक्तिक गटात मात्र त्याला सुवर्णपदक पटकावता आले नाही. चैन प्रतिक्रिया देताना म्हणाला, ‘सॅग स्पर्धेतील कामगिरीमुळे रिओ आॅलिम्पिकपूर्वी आत्मविश्वास उंचावण्यास मदत मिळेल. मला कामगिरीत सुधारणा करण्यास वाव आहे. नारंगला यापूर्वीही पराभूत केले आहे. पण एका स्पर्धेत सलग तीनदा त्याचा पराभव करण्याची ही पहिलीच वेळ आहे.’ भारताच्या चैन, नारंग व सुरेंद्रसिंग राठोड यांनी एकूण ३४९० गुणांची नोंद करीत सुवर्णपदक पटकावले. श्रीलंका संघाला रौप्य, तर बांगलादेश संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. रविवारी क्लीन स्वीप केल्यानंतर भारताने नेमबाजीमध्ये २१ सुवर्ण, ९ रौप्य व ८ कांस्यपदकांची कमाई केली आहे. बांगलादेश एक सुवर्ण, दोन रौप्य व तीन कांस्यपदक पटकावत दुसऱ्या स्थानी आहे.
चैन सिंग ‘गोल्डन फिंगर’ मॅन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2016 3:26 AM