ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण इंटरनेटवर केवळ एकाच विषयाची चर्चा आहे. ती म्हणजे 'मॅनिक्विन चॅलेंज'. सामान्य माणसापासून ते दिग्गज कलाकारांपर्यंत, फुटबॉलच्या मैदानापासून ते अगदी व्हाईट हाऊसपर्यंत सर्वच हे आव्हान स्वीकारत आहेत. या चॅलेंजचे फोटो आणि व्हिडीयोज सोशल मीडियावर शेअर करत आहेत. भारतीय क्रिकेट टीमनंही 'मॅनिक्विन चॅलेंज' स्वीकारले आहे. यासंबंधी अगदी 7 सेकंदांचा व्हिडीओ टीम इंडियाने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. अर्थात यासंबंधी संपूर्ण व्हिडीओ लवकरच पाहायला मिळणार असल्याचीही माहिती पोस्ट करण्यात आली आहे.
पण काय आहे हे 'मॅनिक्विन चॅलेंज'?
लहान पणी ज्यांनी 'स्टेच्यू' हा खेळ खेळला असेल त्यांना हे आव्हान नक्कीच आवडेल. हे आव्हान कुणीही, कुणालाही कुठेही देवू शकते. हे आव्हान दिल्यावर आपण जिथे आहोत, ज्या स्थितीत आहेत, त्याच स्थितीत थांबायचे. जो पर्यंत आव्हान देणारा आपल्याला परवानगी देत नाही, तो पर्यंत आपण जराशीही हालचाल करू शकत नाही.
इंटरनेटवर 'मॅनिक्विन चॅलेंज' गाजले
गेल्या अनेक दिवसांपासून हे आव्हान इंटरनेटवर गाजत आहे. नुकतेच अमेरिकेच्या व्हाईट हाऊस येथे आयोजित एका कार्यक्रमात अमेरिकेतील प्रसिद्ध हास्य कलाकार एलेन, केली रोनाल्ड आणि मिशेल विलियम्स यांनी ही हे आव्हान स्वीकारले होते. प्रसिद्ध फुटबॉल पटू क्रिस्टीयानो रोनाल्डो याने देखील हे आव्हान स्वीकारले. तसेच फुटबॉलपटू जोए हार्ट याने तर मॅच सुरु असताना मैदानावर हे आव्हान स्वीकारले.