सिडनी : सततच्या पराभवांमुळे हवालदिल झालेल्या भारतीय संघाला विजयाचा दिलासा हवा आहे. आॅस्ट्रेलियाविरुद्ध आज शनिवारी होणाऱ्या पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात किमान विजयी शेवट होईल आणि क्लीन स्वीपही टळेल या आशेने धोनी अॅन्ड कंपनीला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल.भारतीय संघ पहिल्या तिन्ही सामन्यात ३०० वर धावा नोंदवून देखील पराभव टाळण्यात अपयशी ठरला. कॅनबेरा येथील चौथ्या सामन्यात विजयापर्यंत पोहोचूनही पराभवाचे तोंड पहावे लागले होते. यामुळे संघाचे मनोबळ ढासळले आहे. पाचव्या सामन्यात विजय मिळाल्यास २६ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी उत्साहाचा संचार होईल. दुसरीकडे भारत ५-० ने पराभूत झाल्यास रेकॉर्ड खराब होईल. या सामन्यासाठी आॅस्ट्रेलियन संघ रिलॅक्स आहे. त्यांनी विश्रांती घेणे पसंत केले. खराब हवामानाचे सामन्यावर सावट आहे. उद्या मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आॅस्ट्रेलियाला ग्लेन मॅक्सवेलचा पर्याय शोधावा लागेल. कॅनबेरा येथे त्याला गुडघ्याला दुखापत होताच मैदान सोडावे लागले होते. शॉन मार्श त्याचे स्थान घेऊ शकतो. भारताची चिंता मात्र वन डे तून टी-२० प्रकारासाठी स्वत:ला सज्ज करणे हीच आहे. या सामन्यानंतर टी-२० मालिका आहे व त्यानंतर टी-२० विश्वचषकातही खेळायचे असल्याने भारतीय संघाला खेळातील बदलानुसार कामगिरी सुधारावी लागेल. अजिंक्य रहाणेचे खेळणे शंकास्पद आहे. त्याच्या हाताला दुखापत झाली असल्याने मनीष पांडे याला मधल्या फळीत संधी दिली जाईल. गुरकिरत मान लक्ष वेधण्यात अपयशी ठरल्यामुळे रविचंद्रन अश्विन त्याचे स्थान घेऊ शकतो. अश्विन मेलबर्न व कॅनबेरा येथे खेळला नव्हता. ईशांत शर्मा, उमेश यादव व भुवनेश्वर कुमार यांनी कॅनबेरा येथे भरपूर धावा मोजल्या होत्या. ईशांत व उमेश या दोघांपैकी एकाला विश्रांती दिली जाईल. पाऊस आणि ओलसर मैदानामुळे भारतीय संघ सराव करू शकला नाही. दहा दिवसांत चार वन डे खेळल्याने भारताला देखील विश्रांती मिळाली. सर्वांचे लक्ष धोनीकडे असेल. गेल्या काही सामन्यात तो धावा काढू शकला नव्हता. मागच्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला. या मालिकेनंतरच्या भारताला वन डे मालिका खेळण्यास खूप वेळ आहे. धोनीची टी-२० विश्वचषकानंतर निवृत्त होण्याची चर्चा आहे. असे झाल्यास धोनीचा हा अखेरचा वन डे समजायला हरकत नाही. (वृत्तसंस्था) सलग चार पराभवानंतरही संघ मानसिकदृष्ट्या खचलेला नाही. अखेरचा वन डे आणि नंतरचे तिन्ही टी-२० सामने जिंकून मुसंडी मारू.आॅस्ट्रेलिया संघ घरच्या परिस्थितीचा पूर्ण लाभ घेत असून आम्ही त्यांना टक्कर दिली. विजयी मार्गावर असताना आम्ही कच खाल्ली. अखेरच्या वन डेसह मालिकेचा गोड शेवट करण्याची इच्छा आहे. - विराट कोहलीमालिका जिंकली असली आमच्या विजयाची भूक संपलेली नाही. अखेरचा सामना जिंकून क्लीन स्वीप देण्यास आम्ही सज्ज आहोत. भारतावर कुठलीही दयामाया दखविणार नाही. आम्ही भारताच्या मधल्या फळीतील उणिवांचा लाभ घेतला. जगातील सर्वोत्कृष्ट संघाला क्लीनस्वीप देण्यात आनंद होईल.- स्टीव्ह स्मिथउभय संघ : भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, गुरकीरत मान, रिषी धवन, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, ईशांत शर्मा, उमेश यादव आणि बरिंदर सरन.आॅस्ट्रेलिया : स्टीव स्मिथ (कर्णधार),अॅरोन फिंच, डेव्हिड वॉर्नर, जॉर्ज बेली, ग्लेन मॅक्सवेल, मिशेल मार्श, मॅथ्यू वेड (युिष्टरक्षक), जेम्स फॉल्कनर, जॉन हेस्टिंग्स, स्कॉट बोलॅन्ड, केन रिचर्डसन, नाथन लियॉन आणि शॉन मार्श.
क्लीन स्वीप टाळण्याचे आव्हान
By admin | Published: January 23, 2016 3:53 AM