बेंगळुरू : इंग्लंडवर धडाकेबाज विजयासह आत्मविश्वास दुणावलेला वेस्ट इंडिज संघ आज रविवारी टी-२० विश्वचषकात दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध खेळणार असून सलामीचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलकडून पुन्हा एकदा वादळी फटकेबाजीची अपेक्षा असेल.इंग्लंडविरुद्ध वेस्ट इंडिजने शानदार खेळ करीत विजय नोंदविला पण लंकेकडून या संघाला कडवे आव्हान मिळू शकते. गेलने ४७ चेंडूत विश्व टी-२० इतिहासात सर्वाधिक जलद शतक ठोकून विंडीजला विजय मिळवून दिला. दुसऱ्या सामन्यात हाच फॉर्म कायम राहिल्यास विंडीजला रोखणे लंकेसाठी कठीण ठरेल. लंकेकडेही अँजेलो मथ्यूज आणि तिलकरत्ने दिलशानसारखे अनुभवी फलंदाज आहेत. विंडीजची फलंदाजी गेलच्या सभोवताल मर्यादित आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध ११ षटकार खेचले. त्याला ३७ चेंडूत आठ चौकार ठोकणाऱ्या मर्लोन सॅम्युअल्सची साथ लाभल्याने अष्टपैलू किरोन पोलार्ड, लेंडल सिमन्स, डॅरेन ब्राव्हो या दिग्गजांची संघाला उणीव जाणवली नाही. सुनील नारायण हा फिरकी गोलंदाज नसला तरी सॅम्युल बद्री, सुलेमान बेन आणि सॅम्युअल्स हे प्रभावी फिरकी मारा करू शकतात.दुसरीकडे लंकेला अफगाणवर विजय नोंदविण्यासाठी घाम गाळावा लागला होता.दिलशानच्या नाबाद अर्धशतकाच्या बळावर लंकेने विजय साजरा केला. ५६ चेंडूत त्याने ८३ धावा केल्या होत्या. या खेळीमुळे आत्मविश्वास संचारला. त्याआधी लंकेला आशिया चषकात तिन्ही पराभवानंतर सराव सामन्यातही सलग दोन पराभवांना सामोरे जावे लागले होते. दिनेश चांदीमल याच्याकडूनही बऱ्याच आशा आहेत. गुडघेदुखीमुळे लसिथ मलिंगा बाहेर पडल्याने त्याची उणीव जाणवणार आहे. (वृत्तसंस्था)संघ यातून निवडणार वेस्ट इंडिज : डेरेन सॅमी (कर्णधार), सॅम्युअल बद्री, सुलेमान बेन, कार्लोस ब्रेथवेट, ड्वेन ब्राव्हो, जान्सन चार्ल्स, आंद्रे फ्लेचर, क्रिस गेल, जेसन होल्डर, एव्हिन लुईस, अॅश्ले नर्स, दिनेश रामदीन, आंद्रे रसेल, मर्लोन सॅम्युअल्स आणि जेरोम टेलर.श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), दुष्मंता चामीरा, दिनेश चांदीमल, तिलकरत्ने दिलशान, रंगना हेराथ, शेहान जयसूर्या, चामरा कपुगेदारा, नुवान कुलशेखरा, सुरंगा लकमल, तिसारा परेरा, सचित्र सेनानायके, दासुन शनाका, मिलिंदा श्रीवर्धने व लाहिरु थिरिमाने.सामन्याची वेळ सायं. ७.३० स्थळ :चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू
गेल ‘वादळ’ रोखण्याचे लंकेपुढे आव्हान
By admin | Published: March 20, 2016 4:10 AM