नवी दिल्ली : विजय हजारे करंडक वन-डे स्पर्धेत विदर्भ आणि झारखंड संघांदरम्यान बुधवारी येथील पालम स्पोर्ट््स मैदानावर उपांत्यपूर्व फेरीची लढत रंगणार आहे. या लढतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर सर्वांची नजर राहणार आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत झारखंड संघाचा अनधिकृत मेंटर राहिलेला धोनी विजय हजारे स्पर्धेत संघाचा सक्रिय सदस्य आहे. त्याने आतापर्यंत सहा लढतीत संघाचे नेतृत्व केले आहे. धोनीच्या उपस्थितीमुळे झारखंड संघ खेळत असलेल्या स्थानावर मोठ्या संख्येने प्रेक्षक गर्दी करीत आहेत. बुधवारी यात बदल घडणार नाही, अशी आशा आहे. जून महिन्यात खेळल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपूर्वी ५० षटकांच्या क्रिकेटच्या प्रकारात धोनीसाठी ही अखेरची स्पर्धा आहे. जम्मू-काश्मीरविरुद्ध कल्याणीमध्ये गेल्या लढतीत विजयी फटका मारणाऱ्या धोनीने या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. गेल्या महिन्यात ईडन गार्डन्सवर त्याने छत्तीसगडविरुद्ध १२९ धावांची खेळी केली होती. विदर्भाविरुद्ध झारखंडचा मार्ग मात्र सोपा नाही. झारखंड संघाने ‘ड’ गटात चार विजय व दोन पराभवांसह अव्वल स्थान पटकावले होते, तर विदर्भाने ‘अ’ गटात पाच विजय व एक पराभवासह अव्वल स्थान मिळवले. रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक बळी घेणारा डावखुरा फिरकीपटू शाहबाज नदीमनेही चांगली कामगिरी केली आहे. राहुल शुक्ला व वेगवान गोलंदाज वरुण अॅरोन यांनीही छाप सोडली आहे. विदर्भातर्फे सलामीवीर फलंदाज जितेश शर्माने आतापर्यंत ४८.५० च्या सरासरीने २९१ धावा केल्या आहेत, तर गणेश सतीशने ५१.८०च्या सरासरीने २५९ धावा फटकावल्या आहेत. गेल्या तीन लढतींमध्ये अपयशी ठरलेला कर्णधार फैज फझल उपांत्यपूर्व फेरीत छाप सोडण्यास उत्सुक आहे. संघाचा सर्वांत यशस्वी गोलंदाज फिरकीपटू अक्षय कर्णेवारने १३.२० च्या सरासरीने १५ बळी घेतले आहेत. (वृत्तसंस्था)
झारखंडचे विदर्भापुढे आव्हान
By admin | Published: March 15, 2017 1:17 AM