मुंबई : सध्या तुफान फार्ममध्ये असलेला मुंबई इंडियन्स शनिवारी घरच्या मैदानावर विजयी लय कायम राखण्याच्या निर्धाराने दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या आव्हानाला सामोरे जाईल. यंदाच्या सत्रातील पहिल्या सामन्यात रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून झालेल्या पराभवानंतर मुंबईकरांनी जबरदस्त वर्चस्व राखताना कोलकाता नाइट रायडर्स, गतविजेते सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चँलेंजर्स बँगलोर, गुजरात लायन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या संघांना धूळ चारली. त्याचवेळी, ५ सामन्यांतून २ विजय मिळवलेल्या दिल्लीपुढे मुंबईचा अश्वमेध रोखण्याचे तगडे आव्हान असेल. गुरुवारी झालेल्या सामन्यात पंजाबविरुद्ध धमाकेदार विजय मिळवून मुंबईकरांनी सर्वच प्रतिस्पर्ध्यांना एकप्रकारे इशाराच दिला. नवोदित आणि अनुभवी खेळाडूंचा योग्य ताळमेळ असलेला मुंबई संघ सध्या तुफान कामगिरी करत आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा सर्वच क्षेत्रात सरस कामगिरी करत असलेल्या मुंबईचा धडाका कसा रोखायचा हाच मुख्य प्रश्न दिल्लीकरांपुढे असेल.
मुंबईकडून सर्वाधिक चमक दाखवलेला युवा नितिश राणा याला लवकर बाद करण्यासाठी दिल्लीकरांना उपाय शोधावे लागेल. त्याचप्रमाणे जोस बटलर, हार्दिक - कृणाला पांड्या बंधू, यष्टिरक्षक पार्थिव पटेल, कर्णधार रोहित शर्मा आणि धडाकेबाज अष्टपैलू केरॉन पोलार्ड अशी तगडी फलंदाजी मुंबईकडे आहे. त्याचप्रमाणे, गोलंदाजीमध्ये मुंबई एका खेळाडूवर अवलंबून नसल्याने दिल्लीसमोर मोठे आव्हान असेल. लसिथ मलिंगा, जसप्रीत बुमराह, अनुभवी हरभजन सिंग यांच्यासह पांड्या बंधू व पोलार्ड हे अष्टपैलू खेळाडू दिल्लीच्या फलंदाजीला जखडवण्यास सक्षम आहे. मात्र, गेल्या सामन्यात गोलंदाजांची पिटाई झाली असल्याने मुंबईपुढेही अडचणी आहेतच.
पॉईंट्स टेबल
दुसरीकडे, दिल्ली विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक आहे. परंतु, तुफान फॉर्ममध्ये असलेल्या मुंबईचे त्यांच्यावर सुरुवातीपासून दडपण असेल. संजू सॅमसम आणि रिषभ पंत यांनी फलंदाजीमध्ये चमक दाखवली आहे. परंतु, सॅम बिलिंग्स, करुण नायर यांच्याकडून अपेक्षित साथ त्यांना लाभलेली नाही. त्याचवेळी आक्रमक फलंदाज श्रेयश अय्यर आणि कर्णधार झहीर खान यांचा दिल्लीला यावेळी फायदा होईल. मुळचे देशांतर्गत स्पर्धेत मुंबईकडून खेळणारे हे दोन्ही खेळाडू दिल्लीसाठी आपला अनुभव पणास लावतील. त्याचप्रमाणे, अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूजचे अपयश दिल्लीसाठी चिंतेची बाब आहे. (क्रीडा प्रतिनिधी)