मार्सिले : स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नेतृत्वाखालील पोर्तुगालचा संघ गुरुवारी युरो चषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी भक्कम बचाव असणाऱ्या पोलंडशी झुंजणार आहे.या स्पर्धेत पोलंड आपल्या भक्कम बचावामुळे नावारूपास आला आहे. पोर्तुगालकडे रोनाल्डोसारखा स्टार खेळाडू आहे, तर पोलंडकडे मायकल पाजडान, कामिल ग्लिक ही जोडी आहे. हंगेरीविरुद्धच्या सामन्यात रोनाल्डोने दोन गोल केले आहेत, तर क्रोएशियाविरुद्धच्या सामन्यात अतिरिक्त वेळेत गोल केला आहे. गटात पोर्तुगालचे तीनही सामने बरोबरीत सुटले आहेत. यात आइसलॅँड (१-१), आॅस्ट्रिया (०-०) व हंगेरी (३-३) तर अंतिम-१६ च्या सामन्यात पोर्तुगालने क्रोएशियाला १-० असे पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.दुसरीकडे कोणत्याही संघाला धक्का देण्याची क्षमता असणाऱ्या पोलंडने आतापर्यंत स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. संघाने संपूर्ण वर्षात फक्त तीन गोल स्वीकारले आहेत, तर युरो चषकात फक्त एकच गोल स्वीकारला आहे. पोलंडने स्पर्धेत आयर्लंड (१-०) व युक्रेनला (१-०) पराभूत केले, तर जर्मनीविरुद्धचा सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. या स्पर्धेत आतापर्यंत फक्त जर्मनीनेच गोल स्वीकारलेला नाही. अंतिम १६ मध्ये मात्र स्वित्झर्लंडने पोलंडला चांगलेच झुंजवले होते. निर्धारित वेळेत सामना १-१ असा बरोबरीत सुटल्यानंतर पेनल्टी शूटआऊटवर पोलंडने विजय मिळविला. पोलंडचे आक्रमण त्यांच्या बचावापेक्षा कमजोर वाटते. त्यांच्या आघाडीचा खेळाडू रॉबर्ट लेवानदोवस्कीने आतापर्यंत फक्त दोनच गोल केले आहेत. पोलंडचे मुख्य काम रोनाल्डोला रोखणे हेच असणार आहे. (वृत्तसंस्था)
रोनाल्डोसमोर पोलंडचे आव्हान
By admin | Published: June 30, 2016 5:58 AM