मोहाली : फलंदाजांच्या समाधानकारक कामगिरीनंतर गोलंदाजांच्या अप्रतिम माऱ्याच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने प्ले आॅफ गाठण्याच्या आशा कायम ठेवताना बलाढ्य कोलकाता नाइट रायडर्सला १४ धावांनी नमवले. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १६७ धावा उभारल्यानंतर कोलकाताला २० षटकांत ६ बाद १५३ धावांचीच मजल मारता आली. आय. एस. बिंद्रा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पंजाबने सुरुवातील पिछाडीवर पडल्यानंतर जबरदस्त पुनरागमन केले. धावांचा पाठलाग करताना सुनील नरेन - ख्रिस लीन या सलामीवीरांनी अपेक्षित आक्रमक फटकेबाजी केली. या वेळी कोलकाता सहज बाजी मारणार असेच दिसत होते. परंतु मोहित शर्माने नरेनला बाद केल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या पंजाबच्या गोलंदाजांनी ठराविक अंतराने कोलकाताला धक्के देत त्यांना दडपणाखाली आणले. लीनने शानदार ५२ चेंडंूत ८ चौकार व ३ षटकारांसह ८४ धावांची खेळी करून कोलकाताच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या होत्या. परंतु, १८ व्या षटकात तो धावबाद झाला आणि सामना पंजाबच्या बाजूने झुकला. येथून पंजाबने मजबूत पकड मिळवताना सामना आपल्या नावे केला. मोहित शर्मा व युवा फिरकीपटू राहुल तेवटिया यांनी अचूक मारा करताना कोलकाताला फटकेबाजीपासून दूर ठेवले.तत्पूर्वी, कोलकाताच्या नियंत्रित माऱ्यापुढे पंजाबने समाधानकारक मजल मारली. कर्णधार ग्लेन मॅक्सवेलने (४४) प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर निर्णायक क्षणी केलेल्या आक्रमक फटकेबाजीमुळे पंजाबच्या धावसंख्येला आकार आला. मार्टिन गुप्टिल, मनन वोहरा, शॉन मार्श फारशी चमक न दाखवता बाद झाल्याने पंजाबवर दडपण आले. यानंतर मॅक्सवेलने रिद्धिमान साहासह चौथ्या विकेटसाठी ७१ धावांची आक्रमक भागीदारी केली. मॅक्सवेलने कोलकाताची गोलंदाजी चोपताना २५ चेंडूत १ चौकार व ४ षटकारांसह ४४ धावांचा तडाखा दिला. साहाने ३३ चेंडूत ३८ धावांची खेळी करुन पंजाबच्या समाधानकारक धावसंख्येत योगदान दिले. (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफल :किंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटकांत ६ बाद १६७ धावा (ग्लेन मॅक्सवेल ४४, रिद्धिमान साहा ३८; ख्रिस वोक्स २/२०, कुलदीप यादव २/३४) वि.वि. कोलकाता नाइट रायडर्स : २० षटकांत ६ बाद १५३ धावा (ख्रिस लीन ८४; राहुल तेवटीया २/१८, मोहित शर्मा २/२४)
पंजाबने उत्सुकता वाढवली...पंजाबच्या विजयानंतर प्ले आॅफमध्ये प्रवेश करण्याची चुरस आणखी वाढली आहे. मुंबई इंडियन्सने आधीच प्ले आॅफ गाठली असल्याने उर्वरित तीन स्थानांसाठी आता कोलकाता, पुणे, हैदराबाद व पंजाब यांच्यात शर्यत आहे. कोलकाताने जर विजय मिळवला असता, तर पंजाबचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असते. अशा परिस्थितीत अव्वल चार संघ निश्चित झाले असते. परंतु, पंजाबने ही उत्सुकता आणखी वाढवली आहे.