हैदराबाद : आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू आणि तिचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांचे सोमवारी हैदराबादमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. रिओ आॅलिम्पिकमध्ये महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत रौप्यपदक पटकावणारी सिंधू आणि तिचे प्रशिक्षक ब्राझीलहून सोमवारी सकाळी हैदराबादमध्ये दाखल झाले. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. आॅलिम्पिकमध्ये पदक पटकावणारी भारताची सर्वांत युवा खेळाडू ठरलेल्या सिंधूच्या स्वागतासाठी तेलंगणा सरकारने मुंबईहून विशेष डबल डेकर बस मागवली होती. विमानतळापासून या बसमध्ये सिंधू व प्रशिक्षक गोपीचंद यांची गाचीबाऊली स्टेडियमपर्यंत रॅली काढण्यात आली. स्टेडियममध्ये त्यांच्या स्वागतासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शालेय विद्यार्थी, शहरातील नागरिक आणि प्रसारमाध्यमांच्या शेकडो प्रतिनिधींच्या गराड्यातून मार्ग काढत सिंधू व तिचे प्रशिक्षक गोपीचंद यांनी बसमध्ये आपले स्थान घेतले. शहरातील प्रमुख मार्गावरून ही रॅली जात असताना आॅलिम्पिक पदक विजेत्या सिंधूच्या नावाच्या जयघोषामुळे पूर्ण हैदराबाद सिंधूमय झाले होते. पी.व्ही. सिंधूसह तिचे प्रशिक्षक गोपीचंद आणि आई-वडील पी.व्ही. रमण आणि पी. विजया, तेलंगणाचे उपमुख्यमंत्री मोहम्मद महमूद अली आणि तेलंगणा व आंध्र प्रदेशचे अनेक मंत्री उपस्थित होते. गळ्यात आॅलिम्पिक रौप्यपदक घातलेली सिंधू मार्गाच्या बाजूला असलेल्या नागरिकांचे अभिवादन हात उंचावत स्वीकारीत होती. रिओ आॅलिम्पिकमध्ये सिंधू आणि महिला मल्ल साक्षी मलिक पदक पटकावण्यात यशस्वी ठरल्या. तेलंगणा सरकारने यापूर्वी २१ वर्षीय सिंधूला पाच कोटी रुपये रोख आणि एक हजार वर्ग फूट जमीन पुरस्कारादाखल देण्याची घोषणा केली आहे. (वृत्तसंस्था)
सिंधूच्या चंदेरी यशाचा धडाक्यात जल्लोष
By admin | Published: August 23, 2016 4:29 AM