विश्वास चरणकर, कोल्हापूर
क्रिकेटविश्वातील सर्वात ‘अनलकी’ कोणता संघ असेल तर तो दक्षिण आफ्रिका. चार वर्षे पूर्ण तयारी करायची आणि ऐन मोक्याला अवसानघातकी कामगिरी केल्यामुळे स्पर्धेतून बाहेर पडायचे ही या संघाची खासियत. यावर मात करण्यासाठी ए. बी डिव्हीलियर्सच्या नेतृत्त्वाखालील संघाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल.
१९७0 पासून वर्णभेदाच्या प्रकरणावरुन बंदी भोगत असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाने १९९१ साली आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरामगन केले, आणि थोड्याच कालावधीत एक बलाढय़ संघ म्हणून आपले स्थान निर्माण केले. पुढच्याच वर्षी म्हणजे १९९२ साली ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत त्यांनी उपांत्यफेरीपर्यंत मजल मारली. उपांत्यफेरीत इंग्लंडविरुध्दचा सामना जिंकणे त्यांना सहज शक्य होते, परंतु सामन्याचे १३ चेंडू शिल्लक असताना पाउस आला यावेळी दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी हव्या होत्या २२ धावा. पण पावसाने दोन षटकांचा खेळ गिळंकृत केल्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी एका चेंडूत २१ धावा करण्याचे सुधारीत लक्ष्य देण्यात आले, जे अशक्यप्राय होते. अशा तर्हेने दक्षिण आफ्रिकेचा संघ फायनलमध्ये पोहचता पोहचता अनलकी ठरला.
या स्पर्धेपासून आतापर्यंत विश्वविजयाने त्यांना सतत हुलकावणी दिली आहे. १९९२ची कसर १९९६मध्ये भरुन काढण्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न केले, पण ऐन महत्त्वाच्या क्षणी नशीबाने त्यांना दगा दिला. साखळी फेरीतील सर्व म्हणजे पाचही सामने जिंकून त्यांनी मोठय़ा थाटामाटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पण कराचीत झालेल्या वेस्ट इंडीजविरुध्दच्या सामन्यात ब्रायन लाराने शतकी खेळी करुन दक्षिण आफ्रिकेला नॉकआउट केले.
या दुर्दैवाच्या फेर्याचा क्लायमॅक्स तर १९९९ साली झाला. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात हातातोंडाशी आलेला घास त्यांना गमवावा लागला. सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेची गाठ पडली ऑस्ट्रेलियाशी. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने सर्वबाद २१३ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने चांगली सुरवात केली, पण त्यांची अवस्था ४ बाद ६१ अशी झाली. जॉन्टी र्होडस आणि जॅक कॅलिस यांनी या संकटातून संघाला सावरले. शेवटच्या षटकांत विजयासाठी दक्षिण आफ्रिकेला हव्या होत्या केवळ ९ धावा. क्रीजवर होती लान्स क्लुजनर आणि अँलन डोनाल्ड ही शेवटची जोडी अन गोलंदाज होता डेमियन फ्लेमिंग.
फ्लेमिंगच्या पहिल्या दोन चेंडूवर क्लुसनरने दणादण दोन चौकार ठोकून सामना बरोबरीत आणला. शेवटच्या चार चेंडूत त्यांना विजयासाठी हवी होती केवळ एक धाव, तर ऑस्ट्रेलियाला हवी होती विकेट.
तिसर्या चेंडूवर धाव निघाली नाही, अन डोनाल्ड धावचित होता-होता वाचला. क्लुसनरचा फटका मिडविकेटवरील मार्क वॉकडे गेला. क्लुसनरने धावायला सुरवात केली, पण नॉनस्ट्रायकरवरील डोनाल्डने त्याचा कॉल ऐकलाच नाही. तो चेंडूकडे पहात होता. पण जेव्हा त्याच्या लक्षात आले की क्लुसनर धावत सुटलाय तेव्हा तो धावला पण तो पर्यंत खूप उशिर झाला होता. मार्क वॉने चेंडू गोलंदाज फ्लेमिंगकडे फेकला, त्याने प्रसंगावधान राखून तो यष्टीरक्षक गिलख्रिस्टकडे टाकला, आणि डोनाल्ड धावचित झाला. सामना टाय झाला पण, सुपरसिक्समध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला हरविले असल्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयी घोषित करण्यात आले. कधी नशिबाने किंवा कधी ऐनवेळी केलेल्या हाराकिरीमुळे संघ अंतिम फेरीत पोहचतच नाही. त्यामुळे या संघावर चोकर्स असा शिक्का पडला आहे. हा शिक्का पुसण्याचे आव्हान यंदा त्यांच्यापुढे आहे.
यंदाच्या विश्वचषकात ए. बी. ए. बी डिव्हीलियर्सच्या नेतृत्त्वाखाली सहभागी झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघात जागतिक दर्जाच्या गोलंदाज आणि फलंदाजांची फौज आहे. कागदावर आणि मैदानावर हा संघ बलाढय़ वाटतो. एबीने नुकतेच ३१ चेंडूत सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम केला आहे. तो गेल, पोलार्ड, धोनी या जातकुळीतील धडाकेबाज फलंदाज आहे. जोडीला शांत, संयमी पण तितकाच चिवट हासिम आमला, ड्युमिनी, ड्यूप्लेसिस, अँबोट, मिलर असे एकापेक्षा एक शिलेदार आहेत. कौंटोन डी कॉक हा यष्टीरक्षक चांगली फलंदाजी करतो आहे. गोलंदाजीत जगातील सर्वोत्तम गोलंदाजापैकी एक असणारा आणि स्टेनगनसारखा धडाडणारा डेल स्टेन याच्यारुपाने ब्रम्हास्त्र आफ्रिकन संघाकडे आहे. बेहार्डीन, फिलँडर, मोर्ने मोर्कल, पार्नेल असे एकापेक्षा एक नामांकित स्टेनचे साथीदार आहेत. फांगिसो आणि इम्रान ताहिर हे फिरकीची बाजू सांभाळण्यास
सक्षम आहेत
दक्षिण आफ्रिका :
एबी डिव्हिलियर्स (कर्णधार), हाशिम आमला (उपकर्णधार), कायले अँबॉट, फरहान बेहार्डीन, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), जीन पॉल डुमीनी, फा डू प्लेसिस, इमरान ताहीर, डेव्हिड मिलर, मॉर्ने मॉर्केल, वॅन पार्नेल, अँरोन फंगिसो, वेर्नोन फिलेंडर, रिली रोसोवू, डेल स्टेन