बंगळुरू : चारपैकी तीन सामने गमविणारे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर तसेच रायजिंग पुणे सुपरजायंट या संघांचे कर्णधार असलेले विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यापुढे आपापल्या संघांना विजयपथावर आणण्याचे आव्हान असेल. उभय संघ आयपीएल-१० मध्ये आज रविवारी एकमेकांविरुद्ध खेळतील.कोहलीने जखमेतून सावरताच अर्धशतकी खेळी केली पण अन्य सहकाऱ्यांच्या अपयशामुळे कमी धावसंख्येच्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे गुजरातविरुद्ध चांगल्या सुरुवातीनंतरही पुणे संघ पराभूत झाला. दोन दिग्गज संघांचे नेतृत्व करणारे कोहली आणि स्मिथ चिन्नास्वामी स्टेडियममध्ये विजयासाठी काय डावपेच आखतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे. आरसीबीला अंतिम एकादशमध्ये समन्वय राखण्यात अद्याप अपयश आले असून पुणे संघाला माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या फॉर्मची चिंता लागली आहे. मागच्या सामन्यात आरसीबीचा पराभव झाला खरा पण मुंबई इंडियन्सविरुद्ध फिरकीपटू सॅम्युअल बद्री याने हॅट्ट्रिक साधली ही संघाच्या जमेची बाब म्हणावी लागेल. ख्रिस गेलकडून निराशा होत आहे. गेल्या ११ डावांत त्याचे एकही अर्धशतक नाही. चिन्नास्वामीची खेळपट्टी मंद असल्याने गेलला चेंडू बॅटवर येण्याची प्रतीक्षा करण्यात अडसर जाणवतो. त्यामुळेच गेलला पुन्हा राखीव बाकावर बसवून वॉटसनचा समावेश अंतिम एकादशमध्ये होऊ शकतो. एबी डिव्हिलियर्सकडून पुन्हा झकास खेळीची अपेक्षा व्यक्त होत आहे. केदार जाधव हा देखील फॉर्ममध्ये परतल्यास आरसीबीला लाभ होईल. गोलंदाजीत सॅम्युअल बद्रीसह यजुवेंद्र चहल आणि पवन नेगी हे चांगली कामगिरी बजावत आहेत. (वृत्तसंस्था)- पुण्याची फलंदाजी स्मिथवर विसंबून आहे. बेन स्टोक्स आणि धोनी यांच्याकडून आरसीबीविरुद्ध काही धावांची व्यवस्थापनाला अपेक्षा असेल. गोलंदाजीत मागील सामन्यात इम्रान ताहीर अपयशी ठरताच डावपेच फिरले. त्याला येथे मात्र मंद खेळपट्टीचा लाभ होऊ शकतो.
संघांना विजयपथावर आणण्याचे आव्हान
By admin | Published: April 16, 2017 3:43 AM