मुंबई : पहिल्या उपांत्य सामन्यात बलाढ्य ओएनजीसीकडून पराभूत झाल्यानंतर स्पर्धेत आव्हान टिकवण्यासाठी विजय आवश्यक असलेल्या अनुभवी इंडियन ओवरसीज बँक (आयओबी) संघाने अपेक्षित निकाल नोंदवताना भावनगर यंगस्टर्सचा ६४-४६ असा सहज पाडाव करीत १०व्या सॅव्हीओ चषक आॅल इंडिया बास्केटबॉल स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले.माटुंगा येथील डॉन बॉस्को शाळेच्या बास्केटबॉल कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या उपांत्य सामन्यात आयओबी संघाला गतविजेत्या ओएनजीसीच्या वेगवान खेळापुढे पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी विजय आवश्यक असलेल्या बँकेने अपेक्षित निकाल लावताना आगेकूच केली. सामन्याच्या सुरुवातीपासूनच तुफान आक्रमक खेळ करताना बँकेने आपला इरादा स्पष्ट केला. त्यात पहिल्याच क्वाटर््रला १३-८ अशी आघाडी घेत आयओबीने भावनगर संघाला दडपणाखाली ठेवण्यात यश मिळवले.संघाच्या मुख्य व अनुभवी खेळाडूंनी मोक्याच्या वेळी वेगवान खेळ करताना आयओबी संघाला मध्यांतराला ३६-२४ अशी मोठी आघाडी मिळवून दिली. बँकेच्या या धडाक्यासमोर पिछाडीवर पडलेल्या भावनगर यंगस्टर्सच्या खेळाडूंकडून अनेक चुका होऊ लागल्या. नेमक्या याच गोष्टीचा फायदा उचलताना बँकेने अखेर ६४-४६ अशी सहज बाजी मारत स्पर्धेतील आपले आव्हान टिकवून ठेवले. प्रसन्ना वेंकटेशने सर्वाधिक २१ गुण मिळवताना आयओबी संघाकडून निर्णायक खेळ केला. ए. अरविंदनेदेखील १९ गुण मिळवताना प्रसन्नाला उपयुक्त साथ देत भावनगर यंगस्टर्सला दबावाखाली आणले. दुसऱ्या बाजूला पराभूत भावनगर संघाकडून युधवीर दहिया (१४) आणि काशी (११) यांनी एकदम झुंजार खेळी केली; मात्र संघाचा पराभव त्यांना टाळता आला नाही. (क्रीडा प्रतिनिधी)
आयओबीने आव्हान टिकवले
By admin | Published: January 18, 2015 12:11 AM