कोलकाता : सुनील नारायण प्रकरण विसरुन कोलकाता नाईट रायडर्स आज, बुधवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्याने इंडियन प्रीमियर लीगमधील आपल्या अभियानाला प्रारंभ करणार आहे. वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज सुनील नारायण याच्या गोलंदाजीबद्दल चॅम्पियन लीग टी- २० स्पर्धेत तक्रार करण्यात आली होती. विश्वचषक स्पर्धेतही तो खेळू शकला नव्हता. मात्र, ‘आयसीसी’ने त्याला रविवारी क्लिन चीट दिली.केकेआर संघाने इडन गार्डनच्या खेळपट्टीचा फायदा घेण्यासाठी सुनील नारायण सारखीच गोलंदाजी करणारा के. सी. करियप्पा याला दोन कोटी ४० लाख रुपये देऊन आपल्या संघात सहभागी करून घेतले आहे. बुधवारी येथे पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे फिरकी गोलंदाजांना चेंडूवर पकड ठेवणे कठीण होणार आहे. दोन्ही संघ तुल्यबळ असून मुंबईकडे किरॉन पोलार्ड, कोरे अॅँडरसन व अॅरॉन फिंच सारखे धडाकेबाज फलंदाज आहेत. २०१३ मध्ये मुंबईने याच मैदानावर चेन्नई सुपरकिंग्जला पराभूत करत जेतेपद पटकावले होते. मागील वर्षी मुंबईला सलग पाच सामन्यांत पराभव पत्करावा लागला होता. मात्र, त्यानंतर त्यांनी आपला खेळ उंचावत अंतिम चार संघात जाग मिळवली खरी मात्र निर्णायक सामन्यात चेन्नई विरुध्द पराभव पत्करावा लागला होता. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या आवडत्या मैदानावर चांगली खेळी खेळू शकतो. या मैदानावर त्याने एकदिवसीय सामन्यात २६४ धावांची ऐतिहासिक खेळी केली होती. केकेआरच्या रॉबिन उत्थपाने ११ रणजी सामन्यांत ९१२ धावा केल्या आहेत. तो कर्णधार गौतम गंभीरसोबत डावाची सुरुवात करेल. मधल्या फळीत मनीष पांडे, सूर्यकुमार यादव व युसुफ पठाण यांच्यावर देखील संघाची जबाबदारी असेल. युसुफ सध्या फॉर्ममध्ये नसला तरी तो आपल्या खेळाच्या जोरावर कोणताही सामना फिरवू शकतो. गोलंदाजीची मदार मोर्नी मॉर्कल व उमेश यादव यांच्यावर असेल. बांगलादेशच्या शाकिब अल हसन याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. तसेच योहान बोथा, ब्रॅड हॉग व अझहर मेहमूद उपयुक्त खेळाडू आहेत. मुंबईच्या गोलंदाजीचा भार मलिंगा, विनयकुमार, हरभजन यांच्यावर असेल. (वृत्तसंस्था)
गतविजेत्यांना मुंबईचे आव्हान
By admin | Published: April 08, 2015 1:24 AM