नवी दिल्ली : आॅस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा मिशेल जॉन्सन आयपीएलमध्ये जेव्हा किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी खेळेल तेव्हा त्याच्यासमोर पहिल्या लढतीत आव्हान असेल ते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा आक्रमक फलंदाज अॅबी डिव्हिलियर्सविरुद्ध गोलंदाजी करणे.जॉन्सनने डिव्हिलियर्सचे वर्णन, क्रिकेटच्या सर्वच स्वरूपातील सर्वोत्तम फलंदाज असे केले आहे.तो म्हणाला, की गोलंदाजीसाठी अॅबी डिव्हिलियर्स हा सर्वात कठीण फलंदाज आहे. गेल्या दोन वर्षांत त्याने शानदार कामगिरी केली आहे. तो सर्वच स्वरूपातील सर्वोत्तम खेळाडू आहे. अॅबीला गोलंदाजी करणे आव्हानात्मक असते. त्याने किंग्ज इलेव्हनचा युवा भारतीय गोलंदाज संदीप शर्मा आणि शार्दूल ठाकूर यांचीही स्तुती केली. तो म्हणाला, की मी गेल्या वर्षी संदीपसोबत खेळलो होतो. त्याच्या खेळात सातत्याने प्रगती होत आहे. मी काल त्याला नेटस्वरही पाहिले. त्याचा वेग वाढला आहे. संदीपची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तो शिकण्यासाठी नेहमी आतुर असतो आणि युवा खेळाडूत हा गुण आवश्यक असतो. मी नवीन खेळाडू शार्दूलवरही प्रभावित आहे.जॉन्सननुसार वन डे आणि टी-२0 क्रिकेटमध्ये गोलंदाजीत जास्त फरक नाही. तो म्हणाला, वन डेतून टी-२0 शी जुळवून घेण्यासाठी काही बदल करावे लागतील असे मला वाटत नाही. आम्ही एका आठवड्याआधी वर्ल्डकप फायनल खेळलो आणि आता आयपीएल खेळत आहोत. त्यानंतर वेस्ट इंडीजमध्ये कसोटी क्रिकेट खेळू. खेळाडूला लगेच त्या स्वरूपाशी जुळवून घेता आले पाहिजे.तसेच फलंदाजांना विचलित करण्यासाठी वेगाची गरज आहे; १४0 कि. मी.पेक्षा जास्त वेगाने योग्य दिशेने गोलंदाजी केल्यास ते कोणत्याही फलंदाजासाठी कठीण आव्हान असेल. (वृत्तसंस्था)
‘डिव्हिलियर्सला गोलंदाजी करणे आव्हानात्मक’
By admin | Published: April 09, 2015 1:13 AM