नवी दिल्ली : आयपीएल स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या न्या. लोढा समितीने चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांवर बंदी घातल्याच्या एक दिवसानंतर क्रिकेट आयोजकांनी चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय बुधवारी तातडीने घेतला.चॅम्पियन्स लीग टी-२० संचालन परिषदेने ही लीग बंद करण्यात आल्याचे मीडियाला पाठविलेल्या वृत्तात म्हटले आहे. या संचालन परिषदेत बीसीसीआय, क्रिकेट द. आफ्रिका तसेच क्रिकेट आॅस्ट्रेलिया या तीन बोर्डांचा समावेश आहे. तिन्ही बोर्डांनी सर्वानुमते निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार २०१५ च्या सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात आयोजित चॅम्पियन्स लीग आता होणार नाही. चॅम्पियन्स लीगला सुरुवातीपासूनच पाठिंबा मिळत नसल्याने ती बंद होण्याची दाट शक्यता होती. लोढा समितीचा रिपोर्ट आल्याच्या निमित्ताने आयोजकांनी ही लीग बासनात गुंडाळण्याच्या निर्णय घेतला. लोढा समितीने लीगचा सध्याचा विजेता चेन्नई सुपर किंग्स या संघावर बंदी आल्यामुळे हा निर्णय घेणे भाग पडले. ही स्पर्धा २००९ साली सुरू करण्यात आली होती. प्रेक्षकांचा पाठिंबा मिळत नसल्याचे कारण संचालन परिषदेने दिले आहे. चॅम्पियन्स लीग रद्द करण्याचा अर्थ असा की, बीसीसीआय आणि अन्य हितधारकांना मिनी आयपीएल आयोजित करण्यात अडचणी येत असाव्यात. सप्टेंबरमध्ये अशी स्पर्धा आयोजित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या; पण लीगऐवजी अन्य कुठली स्पर्धा सुरू करण्याची शक्यता आता मावळली आहे. (वृत्तसंस्था)हा कठीण निर्णय आहे. जगातील खेळाडूंना कौशल्य दाखविण्याचे हे व्यासपीठ होते. दुर्दैवाने मैदानाबाहेर प्रेक्षकांचा हवा असलेला पाठिंबा मिळू शकला नाही. व्यावसायिक भागीदारांचा विश्वास संपादन करून हा निर्णय घेण्यात आला. बीसीसीआय, सीए आणि सीएसए यांचा मी आभारी आहे. सर्व औपचारिकता लवकरच पूर्ण केली जाईल.- अनुराग ठाकूर, सचिव, बीसीसीआय
चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धा रद्द
By admin | Published: July 16, 2015 2:23 AM