ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - क्रिकेटरसिकांचं लक्ष लागून असलेल्या आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीला आजपासून सुरुवात होत आहे. मिनी वर्ल्ड कप म्हणून ओळखल्या जाणा-या आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीची उत्सुकता संपुर्ण जगभरातील क्रिकेटप्रेमींना लागली आहे. विशेष दिन असल्यावर डूडल तयार करणा-या गुगलने चॅम्पिअन्स ट्रॉफीचीही दखल घेतली आहे. गुगलने खास डूडल तयार केलं आहे. विशेष म्हणजे हे डूडल फक्त पाहण्यासाठी नाही तर खेळण्यासाठीही आहे. या डुडलवर क्लिक केल्यावर क्रिकेट गेम सुरु होतो, जो तुम्ही खेळू शकता.
एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचा वाढदिवस किंवा जयंती, तसंच महत्वाचा दिवस असल्यास गुगल नेहमी डूडल तयार करत नोंद घेत असते. त्याचप्रमाणे चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठीही गुगलने अत्यंत मनोरंजक असं डूडल तयार केलं आहे. सर्च इंजिन गुगलचं हे डूडल लोकांना प्रचंड आवडत आहे. मोबाईलवरही गुगल सुरु केलं असता तुम्हाला हे डूडल पाहता येईल, आणि खेळताही येईल. स्लो मोबाईल नेटवर्क असतानाही हा गेम खेळता यावा यासाठी गुगलने खास काळजी घेतली आहे.
Loving the new #GoogleDoodle although I"m not a cricket fan! One of my favourite Google Doodles so far.. pic.twitter.com/4Elg2hTZxI— Riddhi (@booksandpens7) June 1, 2017
आजपासून आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफी 2017 साठी सुरुवात होत आहे. भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड संघ यावेळी मैदानात एकमेकांविरोधात भिडताना दिसतील.
यजमान इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यातील सलामी लढतीने आज चॅम्पियन्स ट्रॉफी वन डे क्रिकेटचा धडाका सुरू होत आहे. इंग्लंडमधील ढगाळ वातावरणात सकाळच्या सत्रात चेंडू स्विंग होत असल्याने उभय संघांसाठी फलंदाजीतील उणिवा दूर सारण्याचे अवघड आव्हान असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजेपासून लढतीचा थरार अनुभवता येणार आहे.
इंग्लंडमधील हवामान क्रिकेटपटूंसाठी किती आव्हानात्मक असते याची झलक सोमवारी पहायला मिळाली. इंग्लंडने द. आफ्रिकेविरुद्ध तिस-या वन डेत अवघ्या २० धावांत सहा गडी गमवले. वन डे क्रिकेटमधील त्यांची ही सर्वांत मोठी दैना आहे. कासिगो रबाडा आणि वेन पार्नेल यांनी इंग्लंडची दाणादाण उडविली होती. अधिक पाटा खेळपट्ट्यांवर ढगाळ वातावरणात कशी फलंदाजी करायची हे यजमान संघालादेखील कळले नव्हते.
बांगलादेशची भारताविरुद्ध सराव सामन्यात अशीच घसरगुंडी झाली. सध्याचा विजेता भारताने ३२४ धावा उभारल्या पण बांगलादेश संघ ८४ धावांत गारद झाला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पूर्वसंध्येला तब्बल २४० धावांनी झालेला पराभव बांगला देशचे मनोबळ खच्ची करणारा आहे.
या सामन्यासाठी ११ खेळाडूंची निवड करणे इंग्लंडसाठी डोकेदुखी ठरली आहे. अष्टपैलू बेन स्टोक्स आणि ख्रिस व्होक्स पूर्णत: फिट झाल्यामुळे अखेरच्या वन डेत अर्धशतक ठोकणा-या जॉनी बेयरेस्टॉ याला राखीव बाकावर बसावे लागू शकते. कोच ट्रॅव्हर बेलिस म्हणाले,‘संघाने बचावात्मक पवित्रा घेत विश्व दर्जाची स्पर्धा जिंकताना मी कुठल्याही संघाला पाहिलेले नाही. साहसाच्या बळावरच मोठी स्पर्धा जिंकता येते.’
या सामन्यात इंग्लंड आणि बांगलादेश यांच्या चिंतेचे कारण एकसारखे आहे. दोन्ही संघांना फलंदाजांकडून अपेक्षा असतील. भारताविरुद्ध सर्वाधिक २४ धावा काढणारा मेहदी हसन याला मात्र आमचा संघ इंग्लंडला पाणी पाजू शकतो असा विश्वास आहे. पहिल्या सामन्यासाठी चांगली तयारी झाली आहे. आम्ही इंग्लंडविरुद्ध अनेकदा चमकदार कामगिरी केली. उद्या विजयाचा विश्वास वाटतो, असे तो म्हणाला.
२०१५ च्या विश्वचषकात बांगलादेशने इंग्लंडला नमविले होते. त्यावेळचे बरेचसे खेळाडू या सामन्यात देखील दिसतील. अॅडिलेड ओव्हलवरील त्या सामन्यात महमदुल्लाहने बांगलादेशकडून शतक झळकविले होते. पण आज पुन्हा नव्याने सुरुवात होणार असल्याने आम्ही चांगल्या सुरुवातीवर लक्ष केंद्रित केल्याचे कोच हतुरासिंघेयांनी सांगितले.