ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 29 - सराव सामन्यातील भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीने न्यूझीलंडचा प्रमुख गोलंदाज टीम साऊदी प्रभावित झाला आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मुख्य स्पर्धेला सुरुवात होण्याआधी सराव सामन्यात मिळवलेल्या विजयाबद्दल टीम साऊदीने भारतीय गोलंदाजांचे कौतुक केले आहे. भारताकडे चांगले गोलंदाज आहेत. आयपीएल खेळल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे तसेच कसोटी मालिकांमध्येही त्यांच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती असे साऊदीने सामन्यानंतर बोलताना सांगितले.
रविवारी भारत आणि न्यूझीलंडमध्ये झालेला सराव सामना भारताने डवकर्थ लुईस नियमाच्या आधारे ४५ धावांनी जिंकला. भुवनेश्वर कुमार आणि मोहंमद शमीची भेदक गोलंदाजी तसेच कर्णधार विराट कोहलीची फलंदाजी या सामन्याचे वैशिष्टय ठरले. भुवनेश्वर कुमार आणि शमी यांच्या वेगवान आणि अचूक टप्प्यावरील स्विंग गोलंदाजीच्या बळावर भारताने न्यूझीलंडला ३८.४ षटकांत १८९ धावांत गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भुवनेश्वर व शमी यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.
प्रत्युत्तरात भारताने ३ बाद १२९ धावा केल्या. या धावसंख्येवरच पावसाचा व्यत्यय आल्याने खेळ थांबवावा लागला. त्यानंतर खेळ होऊ शकला नाही. अशा प्रकारे भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्याची सुरुवात विजयाने केली. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा कोहली ५२ आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी १७ धावांवर खेळत होते. सलामीवीर शिखर धवनने ४0 धावा केल्या.तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या न्यूझीलंडतर्फे केवळ चार फलंदाजांना दुहेरी धावसंख्या नोंदवता आली.
त्यात सलामीवीर ल्युक रोंचीने सर्वांधिक ६६ धावांची खेळी केली तर अष्टपैलू जेम्स नीशाम ४६ धावा काढून नाबाद राहिला. या लढतीत उभय संघाचे प्रत्येकी १३ खेळाडू खेळू शकतात, पण केवळ ११ खेळाडूंना फलंदाजी किंवा गोलंदाजी करण्याची संधी आहे. न्यूझीलंडसाठी नाणेफेक वगळता काहीच सकारात्मक घडले नाही.
विराट कोहलीने शमी व हार्दिक पांड्या यांना नव्या चेंडूने मारा करण्याची संधी दिली. पांड्याला छाप सोडता आली नाही, पण शमीने मात्र सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले. रोंचीने त्याच्याविरुद्ध आक्रमक पवित्राही स्वीकारला होता. शमीने वैयक्तिक दुसऱ्या षटकात अपेक्षेपेक्षा अधिक उसळलेल्या चेंडूवर मार्टिन गुप्तीलला (९) मिड आॅफवर झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर कर्णधार केन विलियम्सन (८) व नील ब्रुम (०) यांना सलग चेंडूंवर माघारी परतवले. रोंची वैयक्तिक २६ धावांवर असताना बुमराहच्या गोलंदाजीवर झेल अश्विनला टिपण्यात अपयश आले. पुढच्या षटकात रोंचीने शमीच्या गोलंदाजीवर दोन चौकार व मिडविकेटला षटकार ठोकला. शमीने या षटकात विलियम्सन व ब्रुम यांना तंबूचा मार्ग दाखविला.