सेंट जोन्स : वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज आणि कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सातव्या क्रमाकांवर असलेला शिवनारायण चंद्रपॉल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. याबरोबरच त्याच्या २२ वर्षांच्या कारकिर्दीला पूर्णविराम मिळाला. ४१ वर्षीय माजी कर्णधाराने आपल्या कसोटी कारकिर्दीत ११,८६७ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या ब्रायन लाराच्या तो केवळ ८६ धावांनी पिछाडीवर होता. या डावखुऱ्या फलंदाजाने १९९४ मध्ये गयाना येथे इंग्लंडविरुद्ध कसोटी कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्या वेळी त्याने शतक झळकाविले होते आणि वेस्ट इंडिजने हा सामना डाव आणि ४४ धावांनी जिंकला होता. चंद्रपॉलने आपला शेवटचा कसोटी सामनासुद्धा इंग्लंडविरुद्ध गेल्या वर्षी मे महिन्यात बार्बाडोस येथे खेळला होता. हा सामना पाच गड्यांनी जिंकत वेस्ट इंडिजने तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधली होती. चंद्रपॉलने १६४ कसोटी सामन्यांतून नाबाद सर्वाधिक २०३ धावा केल्या आहेत. त्याने ही धावसंख्या दोन वेळा गाठली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जॉर्जटाऊन येथे २००५ मध्ये आणि त्यानंतर बांगलादेशविरुद्ध २०१२ मध्ये मीरपूर येथे ५१.३७ या सरासरीने त्याने या धावा फटकावल्या होत्या. त्याने कारकिर्दीत एकूण ३० शतके आणि ६६ अर्धशतके झळकाविली आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये त्याला आॅस्ट्रेलियाविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघात निवडण्यात आले नव्हते. (वृत्तसंस्था)