अमरावती : बॅडमिंटन स्टार, रिओ आॅलिम्पिकची रौप्य पदक विजेती पी. व्ही. सिंधू हिला आंध्र सरकारमध्ये क्लास वन नोकरी देण्यासाठी आंध्र लोकसेवा आयोग कायद्यातील दुरुस्तीस मंगळवारी राज्य विधिमंडळाने परवानगी दिली.आंध्र शासनाच्या १९९४ च्या कायद्यानुसार राज्य शासनात ‘अ’ वर्ग नोकरी देताना उमेदवाराची निवड आंध्र लोकसेवा आयोगाची निवड समिती किंवा सेवायोजन कार्यालयाद्वारे करण्याची तरतूद होती. या कायद्यात दुरुस्ती करीत अत्युच्य कामगिरी करणारे बॅडमिंटन खेळाडू यास अपवाद असतील, असा बदल सुचविण्यात आला आहे. कॅबिनेटच्या मंजुरीस बळ देता यावे यासाठी अधनियमाच्या कलम चारमध्ये दुरुस्ती सुचविण्यात आली आहे. यानुसार सिंधूला राज्य सेवेत विभागीय महसूल अधिकारी म्हणून नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला. राज्याचे अर्थमंत्री यानामाला रामाकृष्णाडू यांनी दुरुस्तीचा प्रस्ताव विधानसभेच्या पटलावर ठेवताच कुठल्याही चर्चेविना सर्वसंमतीने पारित करण्यात आला. थोड्याच वेळात विधानपरिषदेने या कायद्यास मंजुरी प्रदान केली. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी सिंधू हिला राज्याची ब्रँड अॅम्बेसिडर बनविण्याची सरकारची इच्छा असल्याचे जाहीर केले. माझे सरकार राज्यातील अन्य योग्य खेळाडूंना देखील थेट नोकरी देण्यास कटिबद्ध असल्याची त्यांनी ग्वाही दिली.(वृत्तसंस्था)
सिंधूच्या क्लास वन नोकरीसाठी बदलला कायदा
By admin | Published: May 17, 2017 4:11 AM