नवी दिल्ली : ‘‘गेल्या तीन-चार वर्षांपासून संघव्यवस्थापनाने अशा खेळपट्ट्यांना प्राधान्य दिले आहे, ज्यावर कसोटी सामना तीन दिवसांतच संपतो. मात्र माझ्या मते, अनिल आणि विराट दोघेही सकारात्मक असून ते अशा खेळपट्टीवर खेळण्यास पसंत करतील, ज्यावर सामन्याचा निकाल चौथ्या किंवा पाचव्या दिवशी लागेल,’’ असे स्पष्ट मत भारताचा दिग्गज आॅफस्पिनर हरभजनसिंग याने व्यक्त केले. आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर भज्जीने आपले मत मांडले. भज्जी म्हणाला, ‘‘कसोटी क्रिकेट म्हणजे सामन्याच्या पाचही दिवशी विविध स्तरांवर खेळाडूंचा मोठा कस लागतो. जर, आपण पूर्णपणे फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर अवलंबून राहिलो, तर त्याचा मोठा फटकादेखील आपल्याला बसू शकतो. याचे परिणाम आपण टी-२० विश्वचषक नागपूर सामन्यात पाहिलेच आहेत. किवी संघाचे मिशेल सँटेनर आणि इश सोढी याबाबत धोकादायक ठरू शकतात.’’ ‘‘फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर आपल्याला नक्की बळी मिळतील. मात्र, अशीदेखील वेळ येईल जेव्हा गोलंदाजालाच चेंडूच्या टप्प्याचा व दिशेचा अंदाज येणार नाही. कोणता चेंडू उसळेल आणि फिरकी घेईल याचाही अंदाज येणार नाही,’’ असेही भज्जीने या वेळी सांगितले.त्याचवेळी भज्जीने वेगवान गोलंदाजांकडे लक्ष वेधताना, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीसारख्या वेगवान गोलंदाजांना अधिक षटके टाकण्याची संधी मिळावी, असेही म्हटले. (वृत्तसंस्था)
खेळपट्टीबाबतचा दृष्टिकोन बदलावा : हरभजन सिंग
By admin | Published: September 20, 2016 5:21 AM