अहमदाबाद : लिटल मास्टर सुनील गावसकरच्या १0 हजार कसोटी धावा, माजी कर्णधार कपिल देवचे विक्रमी ४३२ बळी आणि त्याचबरोबर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे पहिले द्विशतक अशा अनेक विक्रमांचा साक्षीदार ठरलेल्या सरदार पटेल स्टेडियमला आता जगातील सर्वांत विशेष स्टेडियम करण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. त्याअंतर्गत जुन्या पद्धतीचे काम असणारे हे स्टेडियम तोडण्यास गुरुवारी प्रारंभ झाला.सरदार पटेल स्टेडियममध्ये १९८३ ते २0१४ दरम्यान १२ कसोटी आणि २४ वन डे सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. साबरमती नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे स्टेडियम अनेक विक्रमांचे साक्षीदार ठरले आहे. याच मैदानावर गावस्कर १९८७ मध्ये १0 हजार कसोटी धावा पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज बनला होता. तसेच कपिलने १९९४ मध्ये न्यूझीलंडच्या रिचर्ड हॅडलीचा ४३१ कसोटी बळींचा त्यावेळेसचा विश्वविक्रमही मोडीत काढला होता.याच स्टेडियमवर २०११ वर्ल्डकपचा दुसरा उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळवण्यात आला होता. त्यात भारताने आॅस्ट्रेलियाचा पाच गडी राखून पराभव केला होता. सचिनने आपल्या कारकीर्दीत ठोकलेल्या सहा द्विशतकातील पहिले द्विशतक याच मैदानावर केले होते. सचिनने येथे आॅक्टोबर १९९९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध २१७ धावांची खेळी केली होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर गुजरात क्रिकेट संघटनेची जबाबदारी पेलणाऱ्या भाजपा अध्यक्ष अमित शाह यांचे सहकारी व संघटनेचे अध्यक्ष परिमल नाथवाणी यांनी मोटेरा या नावाने लोकप्रिय असलेले या स्टेडियमचे जुन्या पद्धतीचे काम चार महिन्यातच तोडले जाईल आणि त्यानंतर नवीन स्टेडियम जवळपास दोन वर्षात तयार होईल, असे सांगितले.(वृत्तसंस्था)
पटेल स्टेडियमचा होणार कायापालट
By admin | Published: September 12, 2015 3:10 AM