नवी दिल्ली: 1964च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारे ज्येष्ठ हॉकी खेळाडू आणि माजी कर्णधार चरणजित सिंग (Charanjit Singh) यांचे निधन झाले. आज(गुरुवारी)पहाटे 5 वाजता वयाच्या 92व्या वर्षी हिमाचलमधील उना येथे अखेरचा श्वास घेतला. चरणजीत काही दिवसांपासून आजारी होते. चरणजीत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 1964च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. चरणजीत यांना भारत सरकारने अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्रीनेही गौरविण्यात आले आहे.
चरणजीत यांचा परिचय
चरणजीत सिंग यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1930 रोजी हिमाचल प्रदेशातील उना येथील मेरी गावात झाला. त्यांनी पंजाब विद्यापीठ आणि ब्राउन केंब्रिज स्कूलमध्ये शिक्षण घेतले. निवृत्तीनंतर चरणजीत यांनी हिमाचल विद्यापीठात शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक म्हणून काम पाहिले. 1964 व्यतिरिक्त, 1960 च्या रोम ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या संघाचेही ते भाग होते.
1950 मध्ये भारतीय संघात सामील1949 मध्ये चरणजीत सिंग पंजाब विद्यापीठाच्या हॉकी संघात सामील झाले होते. त्यांची कामगिरी पाहून त्यांना विद्यापीठ संघाचा कर्णधार बनवण्यात आले. हळूहळू चरणजीत यांचे नाव राष्ट्रीय स्तरावर चमकले आणि 1950 मध्ये त्यांची भारतीय हॉकी संघात निवड झाली. 1951 मध्ये चरणजीत भारतीय संघासोबत पाकिस्तान दौऱ्यावरही गेले होते.
1962 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक
रोम ऑलिम्पिकसाठी चरणजीत यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. मात्र, अंतिम सामन्यापूर्वी दुखापत झाल्याने ते विजेतेपदाचा सामना खेळू शकले नाही. अंतिम फेरीत भारताचा पराभव करत पाकिस्तानने सुवर्णपदक जिंकले. 1961 मध्ये चरणजीत भारतीय हॉकी संघाचे उपकर्णधार बनले. 1962 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकणाऱ्या टीम इंडियाचेही ते भाग होते. यासाठी त्यांना 1963 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
1964 मध्ये सुवर्ण पदकाची कामगिरी
1964 मध्ये चरणजीत यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अंतिम फेरी गाठली आणि 1960 च्या ऑलिम्पिकचा बदला पाकिस्तानकडून घेतला. विजेतेपदाच्या लढतीत भारताने पाकिस्तानचा 1-0 असा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर चरणजीत यांना 1964 मध्येच सरकारने पद्मश्री देऊन सन्मानित केले होते.