ऑनलाइन लोकमत किंगस्टन, दि. 9 - प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित 20 षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात 190 धावा केल्या आहेत. विडिंजला विजयासाठी 191 धावांचे आव्हान दिले. विराट कोहली आणि शिखर धवनने भारतीय संघाला धडाकेबाज सुरुवात करुन दिली. कोहली आणि धवन यांनी विंडिजच्या गोलंदाजी फोडून काढली. आक्रमक फटकेबाजी करत या जोडीने संघाचं अर्धशतक फलकावर लावलं. पहिल्या विकेटसाठी कोहली आणि धवनने 64 धावांची भागीदारी केली. कोहलीने विंडिजच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत काही सुरेख फटकेही खेळले. ही जोडी फोडायला विंडिज कर्णधार कार्लोस ब्रेथवेटने शर्थीचे प्रयत्न केले. अखेर केस्रिक विल्यम्सला ही जोडी फोडण्यात यश आलं. विल्यम्सला मोठा फटका मारण्या प्रयत्नात कोहली झेलबाद झाला. कोहलीने 22 चेंडूचा सामना करताना एक षटकार आणि सात चौकाराच्या मदतीने 39 धावा केल्या. कोहली बाद झाल्यानंतर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नाच धवनीही बाद झाला. लागोपाठ बसलेल्या दोन धक्क्यांमधून भारतीय संघाचा डाव पंत आणि कार्तिक जोडीने सावराला. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी केली.मोठ्या कालावधीनंतर भारताच्या टी-२० संघात पुनरागमन केलेल्या दिनेश कार्तिकने जोरदार फटकेबाजी करत 29 चेंडूत 48 धावा ठोकल्या. कार्तिकच्या या खेळीत 5 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश आहे. कार्तिक आपलं अर्धशतक साजरं करणार असं वाटत असतानाच सॅम्युअल्सने त्याचा त्रिफळा उडवत भारताला तिसरा धक्का दिला. सलामीवीर कोहली-धवनकडून झालेल्या फटकेबाजीनंतर पंत-कार्तिक जोडीनेही विंडिजच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला. दोघांनीही मिळून भारताला 150 धावांचा टप्पा गाठून दिला. शेवटच्या षटकांत धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात भारताने आपल्या विकेट बहाल केल्या. कार्तिकनंतर जम बसलेला पंतही लगेच माघारी परतला. धोनी आणि जाधवही फारशी चमक दाखवू शकले नाहीत. धोनी दोन तर जाधव चार धावांवर बाद झाले.
विडिंजसमोर 191 धावांचे आव्हान
By admin | Published: July 09, 2017 10:46 PM