ऑनलाइन लोकमत
कार्डिफ, दि. 12 - आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज सुरू असलेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण लढतीमध्ये श्रीलंकेने पाकिस्तानसमोर विजयासाठी 237 धावांचे आव्हान दिले आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेला पाकिस्तानच्या भेदक माऱ्यासमोर फार मोकळीक मिळाली नाही. अखेर श्रीलंकेला 49.2 षटकांत सर्व बाद 236 धावांपर्यंतच मजल मारता आली.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही. धनुष्का गुणतिलकाच्या (13) रूपात त्यांना पहिला धक्का बसला. मात्र चिवट अर्धशतकी खेळी करणाऱ्या निरोशन डिकवेलाने कुशल मेंडिससोबत (27) 56 आणि अँजेलो मॅथ्यूजसोबत 78 धावांची भागीदारी करत लंकेला 3 बाद 161 असे सुस्थितीत नेले.
पण मॅथ्यूज (39) आणि डिकवेला (73) बाद झाल्यावर श्रीलंकेडा डाव गडगडला. धनंजय डिसिल्व्हा (1) आणि थिसारा परेरा हेही बाद झाल्याने श्रीलंकेची अवस्था 7 बाद 167 असी झाली होती. अशा परिस्थितीत तळाच्या सुरंगा लकमल (26), धनुष गुणरत्ने ( 27 ) आणि यांनी छोट्या पण उपयुक्त खेळी करत संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. पाकिस्तानकडून हसन अली आणि जुनैद खान यांनी प्रत्येकी तीन तर मोहम्मद आमीर आणि फहिमने प्रत्येकी दोन गडी बाद केले.