रायपूर : आठव्या पर्वात प्ले आॅफमधील स्थान जवळजवळ निश्चित झालेल्या चेन्नई सुपरकिंग्स संघाला प्ले आॅफच्या शर्यतीतून बाहेर फेकल्या गेलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. उभय संघांदरम्यान मंगळवारी खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात चेन्नई संघ विजय मिळवत गुणतालिकेतील अव्वल स्थान अधिक मजबूत करण्यास उत्सुक आहे. १२ सामन्यांत ८ विजय व ४ पराजयांसह चेन्नई सुपरकिंग्स संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. दिल्ली संघाला १२ पैकी ८ सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. दिल्ली संघ गुणतालिकेत तळातून दुसऱ्या स्थानी आहे. गेल्या चार सामन्यांत दिल्ली संघाला सलग पराभव स्वीकारावे लागले. दिल्ली संघाने अखेरचा विजय १ मे रोजी किंग्स इलेव्हन पंजाब संघाविरुद्ध मिळवला होता.दिल्ली संघाची यंदाच्या मोसमातील कामगिरी निराशाजनक ठरली आहे; पण प्ले आॅफच्या शर्यतीतून बाहेर गेल्यामुळे त्यांच्याकडे गमावण्यासारखे काही उरलेले नाही. दुसऱ्या बाजूचा विचार करता चेन्नई संघाची आतापर्यंतची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. त्यामुळे चेन्नई संघाचा पराभव करणे दिल्ली संघासाठी सोपी बाब नाही. दिल्ली संघासाठी यंदाच्या सत्रात काहीच अनुकूल घडले नाही. १६ कोटी रुपयांमध्ये करारबद्ध करण्यात आलेला युवराज सिंग फ्लॉप झाला. कर्णधार जेपी ड्युमिनी व सलामीवीर किंटोन डीकॉक यांनाही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. वेगवान गोलंदाज झहीर खानने चांगली कामगिरी केली; पण त्याच्या गोलंदाजीमध्ये आक्रमकता दिसली नाही. दुसऱ्या बाजूचा विचार करता राजस्थानविरुद्ध रविवारी खेळल्या गेलेल्या लढतीमध्ये चेन्नई संघातील उणिवा चव्हाट्यावर आल्या; पण तरी धोनीच्या नेतृत्वाखालील संघ विजय मिळवण्यात यशस्वी ठरला.चांगल्या सुरुवातीसाठी चेन्नई संघाची भिस्त न्यूझीलंडच्या ब्रेन्डन मॅक्युलमच्या कामगिरीवर अवलंबून असल्याचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी कबूल केले आहे. ड्वेन स्मिथला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. चेन्नईतर्फे वेगवान गोलंदाज आशिष नेहराची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. त्याला फिरकीपटू आर. अश्विन व रवींद्र जडेजा यांची साथ लाभली आहे. सध्याच्या फॉर्मचा विचार करताना चेन्नई संघाचे पारडे वरचढ भासत आहे; पण प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणाऱ्या दिल्ली संघात उलटफेर घडवण्याची क्षमता आहे. (वृत्तसंस्था)
दिल्लीसमोर चेन्नईचे आव्हान
By admin | Published: May 12, 2015 12:46 AM