बंगळुरू : गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे तगडे आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासमोर असेल. चेन्नईने चार सामन्यांत तीन विजय मिळविले असून, गत सामन्यांत त्यांना राजस्थान रॉयल्स संघाकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र, त्यापूर्वी दिल्ली डेअरडेव्हिल्स, सनरायझर्स हैदराबाद व मुंबई इंडियन्स या संघांना चेन्नईने पराभूत केले आहे. दुसरीकडे बंगळुरू संघ तीन सामन्यांत दोन गुण मिळवीत गुणतालिकेत तळावर आहे. त्यांना मुंबई इंडियन्स व सनरायजर्स हैदराबाद संघाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे बंगळुरूला बलाढ्य संघाविरुद्ध खेळताना काहीसा दबाव निश्चित असेल. बंगळुरूकडे ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स, विराट कोहली यांसारखे आक्रमक फलंदाज असूनही त्यांना फारसा प्रभाव दाखविता आलेला नाही. गेल हा टी-टष्ट्वेन्टी प्रकारातील सर्वांत धोकादायक फलंदाज मानला जातो. त्याने ५३ सामन्यांत २५ वेळा सर्वाधिक धावा केल्या आहेत. मुंबईविरुद्ध गेल्या सामन्यात २४ चेंडूंत त्याने १० धावा केल्या होत्या. त्यामुळे विजयासाठी गेलसह इतर फलंदाजांना लय सापडेल, अशी आशा बंगळुरूला करावी लागेल. मिशेल स्टार्कच्या अनुपस्थितीतबंगळुरूची गोलंदाजी कमकुवत झाली आहे. वरुण आरोन आपला प्रभाव दाखविण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी अशोक डिंडा याला या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे. फिरकीची कमान युजवेंद्र चहल याच्याकडे असेल. चेन्नईकडे ब्रँडन मॅक्युलम आणि ड्वेन स्मिथ या फलंदाजांची आक्रमक जोडी आहे. स्मिथने मुंबईविरुद्धच्या सामन्यात केवळ ३० चेंडूंत ६२ धावांची घणाघाती खेळी केली होती. कर्णधार महेंद्रसिंह धोनीने चार सामन्यांत ११७ धावा केल्या आहेत. मात्र, एकाच संघासाठी शंभर सामने खेळणाऱ्या सुरेश रैनाची बॅट मात्र अजून तळपलेली नाही. गोलंदाजीची कमान आशीष नेहरा, ईश्वर पांडे, मोहित शर्मा, ड्वेन ब्राव्हो यांच्याकडे असेल. (वृत्तसंस्था)
बंगळुरूसमोर चेन्नईचे आव्हान
By admin | Published: April 22, 2015 3:12 AM