पंजाबवर सात गडी राखून मात : ड्यू प्लेसिसची अर्धशतकी खेळीमोहाली : गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर फॅफ ड्यू प्लेसिसच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने शनिवारी खेळल्या गेलेल्या लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा सात गडी राखून पराभव केला आणि गुणतालिकेत अव्वल स्थानासह आयपीएलच्या प्ले आॅफमध्ये स्थान मिळवले. चेन्नईने पंजाबचा डाव ७ बाद १३० धावांत रोखला आणि प्रत्युत्तरात खेळताना विजयासाठी आवश्यक धावा १६.५ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. ड्यू प्लेसिसने ४१ चेंडूंमध्ये ५ चौकार व १ षटकाराच्या साहाय्याने ५५ धावांची खेळी केली तर सुरेश रैनाने ३४ चेंडूंना सामोरे जाताना ४ चौकारांच्या मदतीने नाबाद ४१ धावा फटकावल्या. साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात विजय मिळवित चेन्नईने १४ सामन्यांत एकूण १८ गुणांची कमाई केली. आरसीबी व केकेआर यांनी प्रत्येकी १३ सामने खेळले असून, त्यांच्या खात्यावर प्रत्येकी १५ गुणांची नोंद आहे. सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स व राजस्थान रॉयल्स या संघांनी प्रत्येकी १३ सामन्यांत प्रत्येकी १४ गुणांची कमाई केली आहे. गत उपविजेत्या पंजाब संघाला या वेळी केवळ ६ गुणांवर समाधान मानावे लागले. त्याआधी, गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने किंग्ज इलेव्हन पंजाबचा डाव ७ बाद १३० धावांत रोखला. अक्षर पटेलने अखेरच्या षटकांमध्ये आक्रमक खेळी करीत यजमान संघाला सव्वाशेचा पल्ला ओलांडून दिला. पंजाबची १४व्या षटकात ६ बाद ७८ अशी अवस्था झाली होती, पण पटेलने सातव्या विकेटसाठी ऋषी धवनच्या साथीने ४४ धावांची भागीदारी करीत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. पटेलने २९ चेंडूंना सामोरे जाताना २ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ३२ धावांची खेळी केली. धवनने २० चेंडूंमध्ये १ चौकार व २ षटकारांच्या मदतीने नाबाद २५ धावा फटकावल्या. चेन्नईतर्फे पवन नेगीने चार षटकांत २५ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले तर हुकमी आर. अश्विनने ४ षटकांत १४ धावांत एक बळी घेतला. पंजाब संघाचा कर्णधार जॉर्ज बेलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. पंजाब संघाची सुरुवात निराशाजनक झाली. वृद्धिमान साहाने नेगीच्या गोलंदाजीवर चौकार तर ईश्वर पांडेच्या गोलंदाजीवर षटकार वसूल करीत मोठी खेळी करण्याचे संकेत दिले, पण नेगीने डावाच्या तिसऱ्या षटकात त्याला माघारी परतवले. (वृत्तसंस्था)किंग्ज इलेव्हन पंजाब वृद्धिमान साह झे. मॅक्क्युलम गो. नेगी १५, मनन वोहरा झे. नेहरा गो. पांड्ये ४, जॉर्ज बेली झे. धोनी गो. नेहरा १२, ग्लेन मॅक्सवेल त्रि. गो. जडेजा ६, गुरक्रीत सिंग यष्टीचीत धोनी गो. अश्विन १५, डेव्हीड मिलर झे. जडेजा गो. नेगी ११, अक्षर पटेल झे. धोनी गो. ब्रावो ३२, रिषी धवन नाबाद २५, बेउरन हेंड्रीक्स नाबाद १. अवांतर - ९. एकूण : २० षटकांत ७ बाद १३० धावा. गोलंदाजी : पवन नेगी ४-०-२५-२, ईश्वर पांड्ये ३-०-२२-१; आशिष नेहरा ३-०-१७-१; आर. अश्विन ४-०-१४-१; रवींद्र जडेजा ३-०-१८-१; सुरेश रैना १-०-८-०; ड्वेन ब्रावो २-०-२०-१. चेन्नई सुपर किंग्ज माईक हसी झे. साहा गो. संदीप शर्मा १, ब्रेंडन मॅक्क्युलम त्रि. गो. हेंड्रीक्स ६, फाफ ड्यू प्लेसिस त्रि. गो. धवन ५५, सुरेश रैना नाबाद ४१, एम. एस. धोनी नाबाद २५. अवांतर - ६. एकूण : १६.५ षटकांत ३ बाद १३४ धावा. गोलंदाजी : संदीप शर्मा २-०-९-१; बेउरन हेंड्रीक्स ३-०-२५-१; गुरक्रीत सिंग ३-०-२२-०; रिषी धवन २-०-१२-१; ग्लेन मॅक्सवेल १-०-८-०; अक्षर पटेल ३-०-२८-०; अनुरीत सिंग २.५-०-३-०.
चेन्नई प्ले आॅफमध्ये
By admin | Published: May 17, 2015 1:20 AM