पुणे : प्रो बास्केटबॉल लीग स्पर्धेत दक्षिण विभागाच्या ‘बेस्ट आॅफ थ्री’मधील उपांत्य सामन्यात सोमवारी चेन्नई स्लॅम संघाने पुणे पेशवाजवर ९८-९१ने विजय मिळवला. सलग ४ विजयानंतर यजमान पुण्याचा हा पहिलाच पराभव ठरला. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या या लढतीत पुण्याच्या नरेंदर ग्रेवालला दुखापतीमुळे बाहेर बसावे लागले तर, अजिंक्यमानेची कमतरता देखील पुण्याला सुरुवातीपासून जाणवली. पुण्याच्या संघाने चेन्नई स्लॅमला चांगली टक्कर दिली पण, अखेर त्यांना पराभूत व्हावे लागले. चेन्नईकडून सामनावीर जयरामने २९ गुणांची कमाई केली. पहिल्या क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघात चांगली चुरस पहायला मिळाली. चेन्नईने आक्रमक खेळ करीत पहिल्या क्वॉर्टरमध्ये २५-१८ने सरशी साधली. दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये एक वेळ पुण्याचा संघ १२ गुणांनी पिछाडीवर होता पण, पुण्याच्या खेळाडूंनी आपला खेळ उंचावत मध्यंतराला संघाला ४१-४० अशी आघाडी मिळवून दिली. पुण्यासमोर जयरामचे आव्हान होते पण, दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये त्याला रोखण्यामध्ये पुण्याला यश मिळाले.तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये पुण्याने आपला हाच फॉर्म कायम ठेवला. तिसऱ्या क्वॉर्टरच्या अखेरीस त्यांच्याकडे ६३-६२ अशी आघाडी होती. चौथ्या क्वॉर्टरमध्ये पाच मिनिटे शिल्लक असताना चेन्नईने ७९-७३ अशी आघाडी घेतली. ३ मिनिटे शिल्लक असताना पुण्याने अजिंक्य मानेच्या जोरावर लढत ८१-८१ अशी बरोबरीत आणली. मात्र, अगू व कार्मेल यांनी निर्णायक गुणांच्या जोरावर चेन्नईला विजय केले. (क्रीडा प्रतिनिधी)निकाल : चेन्नई स्लॅम : ९८ (जयराम २९, रामकुमार २५, कार्मेल १७) आणि पुणे पेशवाज : ९१ (अभिषेक वाय. पी. २४, अजिंक्य माने २२, व्ही. दास १३).
चेन्नई स्लॅमची पुणे पेशवाजवर मात
By admin | Published: July 26, 2016 1:24 AM