सचिन कोरडे, मडगावचेन्नईयन एफसीने गोव्याचा पराभव करीत आयएसएलचा चषक पटकविला खरा; पण सामन्यानंतर जो ‘सामना’ रंगला ते मात्र धक्कादायक होते. एफसी गोवाचे सहमालक दत्तराज साळगावकर यांना मैदानावरच धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून चेन्नईयन एफसीचा खेळाडू इलानो ब्लूमर (ब्राझील) याला रविवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान अटक करण्यात आली. दत्तराज साळगावकर यांनी मडगाव पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे मडगाव पोलीस ठाणे परिसरात रात्री उशिरापर्यंत तणाव होता. या घटनेचा निषेध म्हणून मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बक्षीस वितरण समारंभास उपस्थित न राहता, आल्या पावली परतणे पसंत केले. एफसी गोवाच्या संपूर्ण संघाने बक्षीस वितरण समारंभावर बहिष्कार टाकला. माहितीनुसार, सामना संपल्यानंतर दत्तराज साळगावकर मैदानात उतरले होते. मैदानावर येताच चेन्नईयन एफसीचा खेळाडू ब्लूमरने त्यांच्याशी हुज्जत घातली. एवढेच नव्हे, तर त्याने साळगावकर यांना धक्काबुक्कीसुद्धा केली. हा सर्व प्रकार मैदानावर उपस्थित असलेले चाहतेसुद्धा बघत होते. हे चित्र पाहून एफसी गोवाचे प्रशिक्षक झिको व इतर पदाधिकारी त्यांच्याजवळ धावून आले. हा प्रकार चेन्नईयन एफसीचा सहमालक अभिषेक बच्चनही बघत होता. अभिषेकनेही मध्यस्थी करीत ब्लूमर याला बाजूला नेले. मात्र, घडलेली घटना गंभीर असल्याने साळगावकर यांनी ब्लूमर याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली. स्वीय सहायकांना धक्काबुक्कीसामन्यावेळी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांचे स्वीय सहायक शैलेश उगाडेकर यांना पोलिसाकडून धक्काबुक्कीचा प्रकार घडला. उगाडेकर यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीप्रमाणे, पत्नी व मुलांसह उगाडेकर हे फुटबॉल सामन्यासाठी जाताना त्यांच्याकडे चिप्स असल्याने त्यांना सुरक्षा रक्षकाने अडवले. तेथील एका पोलिसानेही त्यांना शिवीगाळ केली. उगाडेकर हे सामना संपवून परत येताना पुन्हा एकदा त्या पोलिसाने वाद उकरून काढला. सहायक प्रशिक्षकांच्या अंगावरही धावला...चेन्नईयन एफसीचा खेळाडू ब्लूमर हा सामना संपल्यानंतर एफसी गोवाच्या सहायक प्रशिक्षकांच्या अंगावरही धावून गेला होता. त्या वेळी सहमालक श्रीनिवास धेंपे, एफसी गोवाचे सीईओ सुखविंदर आणि झिको यांनी त्याला आवरण्याचा प्रयत्न केला. हा वादही चांगलाच विकोपाला गेला होता. मध्यस्थी करताना अधिकाऱ्यांनी धेंपे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र धेंपेसुद्धा चांगलेच आक्रमक झाले होते. अखेर घडलेल्या प्रकारावर संताप व्यक्त करीत त्यांनी बक्षीस वितरण समारंभावर बहिष्कार टाकला. एवढेच नव्हे, तर त्यांनी पत्रकार परिषदेसही हजेरी लावली नाही.
‘चेन्नईयन’च्या खेळाडूस अटक
By admin | Published: December 22, 2015 3:03 AM