मुंबई : मुंबई महापौर चषक आंतरराष्ट्रीय खुल्या अ गट बुध्दिबळ स्पर्धेमधील दुसऱ्या साखळी सामन्यामध्ये प्रथम मानांकित ग्रँडमास्टर क्रवत्सीव मार्टिनने भारताचा फिडे मास्टर मित्रभा गुहाचा ५० व्या चालीत पराभव करून सलग दुसरा गुण घेतला. व्हीनस चेस अकॅडमीतर्फे मुंबई उपनगर जिल्हा बुध्दिबळ संघटना आयोजित अन्य सामन्यात तृतीय मानांकित ग्रँडमास्टर अमानातोव्ह फारुख, चौथा मानांकित ग्रँडमास्टर रोझुम इवान, भारताचा ग्रँडमास्टर संदीपन चंदा, भारताचा ग्रँडमास्टर दिप्तायण घोष, भारताचा फिडे मास्टर एरीगैसी अर्जुन यांनी विजयीदौड कायम राखली.
बुध्दिबळ स्पर्धेच्या पहिल्या पटावर कॅटलान पध्दतीने सुरु झालेल्या डावात अग्रमानांकित क्रवत्सीव मार्टिनने मित्रभा गुहावर २३ व्या चालीला वर्चस्व मिळविले. त्यानंतर मार्टिनने मित्रभा गुहाच्या राजाला दुर्बल करीत अर्धशतकी चालीत शह दिला. दुसऱ्या पटावर ग्रँडमास्टर अमानातोव्ह फारुख विरुद्ध पांढऱ्या मोहरानी खेळताना भारताच्या आयएम नवीन कन्नाने वजिराच्या प्यादाने डावाला प्रारंभ केला. त्याला प्रत्युत्तर देतांना फारुखने किंग इंडियन पध्दतीचा अवलंब केला. हत्तीच्या चुकीच्या चालीचा लाभ उठवून फारुखने नवीन कन्नाच्या राजाला ६३ व्या चालीत शरणांगती पत्करण्यास भाग पाडले.
चौथा मानांकित ग्रँडमास्टर रोझुम इवानने भारताचा आयएम विक्रमादित्य कुलकर्णीचा, ग्रँडमास्टर संदीपन चंदाने भारताच्याच कॅन्डीडेट मास्टर कुशाग्र मोहनचा तर ग्रँडमास्टर दिप्तायण घोषने भारताच्याच फिडे मास्टर रथान्वेल व्ही.एस.चा पराभव केला. भारताचा फिडे मास्टर एरीगैसी अर्जुनने ग्रँडमास्टर झेड.रासेतवर अटीतटीच्या लढतीत विजय मिळविला. सुरुवातीला अर्जुनची पटावरील स्थिती खराब होती. परंतु रासेतच्या एका प्याद्याची चुकीची खेळी अर्जुनला विजयी पुनरागमन करून देणारी ठरली. परिणामी अर्जुनने रासेतच्या राजाला ४२ व्या चालीला नमविले.