सचिन कोरडे : देशात बुद्धिबळाचा वाढता प्रचार आणि प्रसार पाहाता या खेळाचा शालेय अभ्यासक्रमात ‘नॉन मार्क’ विषय म्हणून समावेश व्हावी, अशी आमची तीव्र इच्छा आहे. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत; परंतु शाळांमध्ये इतर कार्यक्रमांचा डोलारा पाहाता बºयाच अडचणी येत आहेत. काही राज्यांतील शाळांनी तो सुरू केलेला आहे. देशात सर्वच खासगी आणि सरकारी शाळांतील प्रशिक्षकांना एका छताखाली आणण्याचाही आमचा विचार आहे. तसे झाल्यास बुद्धिबळाला ‘बळ’ मिळेल, असे आशियाई बुद्धिबळ विभाग प्रमुख तसेच फिडे एथिक्स समितीचे भारतीय सदस्य रवींद्र डोंगरे यांनी सांगितले.गोव्यात झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर ओपन स्पर्धेदरम्यान डोंगरे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, गोव्यात काही शाळांत हा अभ्यासक्रम सुरू झालेला आहे. मीच तो अभ्यासक्रम तयार केला होता. जीसीएचे सचिव किशोर बांदेकर यांनी माझ्याशी संपर्क साधला होता. त्यांच्या मागणीवरून मी हा प्रकल्प तयार केला. या अभ्यासक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारतात सध्या बुद्धिबळाची स्थिती कशी आहे?भारतामध्ये सध्या बुद्धिबळाचे पोषक वातावरण आहे. या खेळाचा विकास जोरात सुरू आहे. लोकप्रियता आणि प्रचारही खूप वेगाने सुरू आहे. त्यामुळेच जागतिक बुद्धिबळ संघटनेकडून आपली दखल घेतली जात आहे. त्यांच्याकडून आपल्याला मोठे सहकार्य आणि योगदान दिले जाते. भारतात सध्या सर्वाधिक मानांकित खेळाडू आहेत. जवळ-जवळ साडेतीनशे ओपन स्पर्धा देशात होत आहेत. वर्षातून १० ग्रॅण्डमास्टर स्पर्धा होतात.त्यामुळे खेळाडूंना उसंत नाही. आमच्या वेळी मात्र स्थिती फार वेगळी होती. आम्हाला स्पर्धांची वाट बघावी लागायची. एवढ्या स्पर्धा होत नव्हत्या. आता स्थिती खूप बदलली आहे. खेळाडूंनाच आता विश्रांती घ्यावीशी वाटते. नॉर्म मिळविण्यासाठी आता देशातील स्पर्धा सहभागी होण्याची संधी खेळाडूंना मिळत आहे. पंच होण्यासाठीही अशा ओपन स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. गोव्यातील स्पर्धा आंतरराष्ट्रीय दर्जाची.... गोव्यात पहिल्यांदाच आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय ओपन ग्रॅण्डमास्टर स्पर्धाअत्यंत चांगल्या पद्धतीने खेळविण्यात आली. अत्यंत सकारात्मक वातावरण आहे. परदेशात हजार खेळाडूंची जशी स्पर्धा होते तशीच ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. खेळाडूंसाठी उपयुक्त असं वातावरण आहे. मी बºयाच विदेशी स्पर्धा पाहिल्या, त्याच तोडीची ही स्पर्धा आहे. आयोजकांचे अभिनंदन करायला पाहिजे. पहिल्यांदाच १२०० हून खेळाडूंचा सहभाग पाहाता भविष्यात ही स्पर्धा गोव्यासह इतर जवळील राज्यांतील बुद्धिबळपटूंसाठी मोठी बुस्ट ठरेल, असे वाटते.विद्याप्रसारक मंडळाकडून ‘चेस इन स्कूल’महाराष्ट्र चेस असोसिएशनचा ‘चेस इन स्कूल’ बघून गोव्याच्या विद्याप्रसारक मंडळाच्या अध्यक्षांनी आम्हाला फोन केला. त्यांनी आमच्या प्रकल्पाची माहिती मिळवली. गोव्यात असा प्रकल्प सुरू करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यानुसार बुद्धिबळातील पदकविका अभ्यासक्रमही त्यांनी सुरू केलेला आहे. त्यामुळे मी तसा अभ्यासक्रम आणि प्रकल्प तयार केला. तो विद्याप्रसारक मंडळाकडून राबविण्यात येत आहे. आता लवकरच विद्याप्रसारक मंडळाकडून पदविका प्राप्त विद्यार्थी बाहेर पडतील. त्याचा इतर खेळाडूंना घडविण्यासाठी खूप मोठा फायदा होईल. फिडे एथिक्स कमिशनवर पहिल्यांदाचया समितीतील सदस्य नामांकित नसून निवडले गेलेले आहेत. या समितीकडे कायदेशीर प्रकरणे हाताळली जातात. ‘कोड आॅफ एथिक्स कमिशन’द्वारेही प्रकरणांचा निकाल लावला जातो. खेळाडू, देश आणि संघटनांची प्रकरणे या समितीकडे येतात. काही न्यायालयांकडेही सोपविली जातात. या समितीवर निवड झालेला मी पहिला भारतीय आहे. त्यामुळे एक मोठी जबाबदारी माझ्यावर आहे.
बुद्धिबळ अभ्यासक्रमात यायला हवे!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 5:45 PM
आशियाई बुद्धिबळ विभागाचे अध्यक्ष रवींद्र डोंगरे यांच्याशी बातचित
ठळक मुद्देदेशात सर्वच खासगी आणि सरकारी शाळांतील प्रशिक्षकांना एका छताखाली आणण्याचाही आमचा विचार आहे. तसे झाल्यास बुद्धिबळाला ‘बळ’ मिळेल, असे आशियाई बुद्धिबळ विभाग प्रमुख तसेच फिडे एथिक्स समितीचे भारतीय सदस्य रवींद्र डोंगरे यांनी सांगितले.