सचिन कोरडे, पणजी : भारतात बुद्धिबळ हा खेळ विश्वनाथन आनंदच्या विश्वविक्रमी कामगिरीने प्रकाशझोतात आला.ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न जगभरातील ग्रॅण्डमास्टर्सपाहात होते. मात्र, बुद्धिबळाचा समावेश ऑलिम्पिकमध्ये करता येणार नाही, यावर ऑलिम्पिक समिती ठाम होती. अखेर प्रदीर्घ प्रयत्नांनंतर ‘फिडे’ला यश आले आहे. आता रॅपिड व ब्लिट्झ या दोन प्रकारच्या स्पर्धा २०२४ मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळविल्या जातील. याबाबतची अधिकृत घोषणा फिडेचे अध्यक्ष अकार्डे ड्वारकोविच यांनी केली. फिडेने याचे पत्रकही काढले.२०२४ मध्ये ‘फिडे’ संस्थेला १०० वर्षे पूर्ण होतील. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बुद्धिबळ खेळविला गेल्यास या सुवर्णमहोत्सवी वर्षातील मोठी भेट असेल, असे फिडे अध्यक्षांनी म्हटले. या खेळाच्या ऑलिम्पिक समावेशासाठी १२ फेब्रुवारीपासून विशेष मोहीम सुरू करण्यात आली होती. ही मोहीम यशस्वी होत असल्याचे अकार्डे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘बुद्धिबळ आता २०२४ चा उमेदवार असेल. रॅपिड व ब्लिट्झचा समावेश पॅरिस आॅलिम्पिकमध्ये झाला आहे. बुद्धिबळ जगात कोट्यवधी लोक खेळतात. एक ‘ग्लोबल स्पोटर््स’ म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. रॅपिड आणि ब्लिट्झने ते सिद्ध केले आहे. या दोन्ही प्रकारच्या खेळाचा ‘फॉर्मेट’, नियम व अटी तयार करून त्या ऑलिम्पिक समितीकडे पाठविल्या जातील. ऑलिम्पिकसाठी नियमात काही बदल केले जातील. ब्लित्झ या खेळात फ्रान्स जगात दुसºया क्रमांकावर आहे. जर हा खेळ २०२४ मध्ये समाविष्ट झाला तर जगभरात या खेळाडूंची संख्या प्रचंड वाढेल. ऑलिम्पिकमध्ये या खेळाचा समावेश व्हावा, यासाठी जगभरातील खेळाडू प्रतिक्षेत आहेत. २०२४ मध्ये का होईना हा खेळ समाविष्ट होईल. हा निर्णय जागतिक बुद्धिबळासाठी क्रांती घडवून आणणार आहे, असेही फिडे अध्यक्षांनी म्हटले आहे. दरम्यान, गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नीलेश काब्राल यांनी या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत केले आहे.
अंध बुद्धिबळाचा आशियाईत समावेशजकार्ता येथे २०१८ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत अंध बुद्धिबळाचा समावेश करण्यात आला होता. त्याआधी, सिडनी येथे २००० मध्ये झालेल्या उन्हाळी आॅलिम्पिक स्पर्धेत बुद्धिबळ हा प्रदर्शनीय खेळ होता. या स्पर्धेत ग्रॅण्डमास्टर अलेक्सी शिरोव आणि भारताचा विश्वनाथन आनंद यांच्यात दोन सामने खेळविण्यात आले होते. आता २०२० मध्ये टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतही या खेळाचा समावेश व्हावा, असा अर्ज फिडेकडून सादर करण्यात आलेला आहे.
बुद्धिबळाची व्याप्ती...फिडेची (इंटरनॅशनल चेस फेडरेशन) स्थापना पॅरिसमध्ये१९२४ मध्ये झाली होती. सध्या १८९ देशांतील राष्ट्रीय संघटना फिडेचे सदस्य आहेत. ६० कोटींहून अधिक लोक बुद्धिबळ खेळतात. जागतिक स्तरावर बुद्धिबळ हा झटपट पुढे येणारा खेळ आहे. त्यामुळे त्याचा आॅलिम्पिकमध्ये समावेश व्हावा, असा आग्रह फिडेचा होता.
खेळाचा चेहरामोहरा बदलणार : बांदेकर ऐतिहासिक निर्णय. फिडेचे जितके कौतुक करावे तितके कमीच. गेल्या अनेक वर्षांपासून बुद्धिबळाचा समावेश ऑलिम्पिकमध्ये करण्यात यावा, अशी मागणी केली जात होती. मात्र, ऑलिम्पिक समितीकडून नेहमीच काही ना काही त्रुटी काढण्यात येत होत्या. खेळाचे ‘फंडिंग’ कमी आहे. हा खेळ ऑलिम्पिक नियमात बसत नाही. खेळाचा फॉर्मेट तसा नाही, असे बोलले जायचे. मात्र, ब्लित्झ आणि रॅपिड या नव्या फॉर्मेटमध्ये बुद्धिबळाला अधिक चालना मिळाली. ब्लित्झ हा अर्ध्या तासाचा तर रॅपिड हा केवळ पाच मिनिटांचा खेळ आहे. जागतिक स्तरावरची लोकप्रियता पाहाता ऑलिम्पिक समावेशामुळे आता या खेळाचा चेहरामोहरचा बदलेल. देशात बºयाच राज्यांमध्ये बुद्धिबळाचा शाळेत समावेश झाला आहे. त्यामुळे देशात या खेळाडूंची संख्या प्रचंड वाढेल, असा विश्वास आहे, असे अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार किशोर बांदेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.