Fide World Cup Final R Praggnanandhaa : १८ हे वय फार टेंशन घेण्याचं नक्कीच नाही... पण, या वयात सचिन तेंडुलकरसह अनेकांनी आंतरराष्ट्रीय क्रीडाविश्वात नाव कमावलं... आज त्या यादीत बुद्धीबळपटूआर प्रज्ञाननंदा याचे नाव दाखल झाले आहे. बाकू येथे झालेल्या बुद्धीबळ वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या या १८ वर्षीय खेळाडूने जागतिक स्तरावरील अव्वल खेळाडूंना पराभवाचा धक्का देत फायनलमध्ये धडक मारली. त्याच्यासमोर नंबर वन मॅग्नस कार्लसन याचे आव्हान होते, तरीही तो डगमगला नाही. त्याने अखेरपर्यंत कडवी टक्कर दिली, परंतु अनुभवाची शिदोरी पाठीशी असलेल्या कार्लसनने बाजी मारली. प्रज्ञाननंदा जरी उप विजेता ठरला असला तरी त्याने घेतलेली ही झेप ही अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरली. त्याचे आज सर्वच कौतुक करत आहेत.
मुख्य फेरीतील लढतीत प्रज्ञाननंदाने नॉर्वेच्या कार्लसनला कडवी टक्कर देताना दोन्ही गेम ड्रॉ सोडवले. यापूर्वी प्रज्ञाननंदाने टाय ब्रेकरच्या सामन्यात भल्या भल्या टॉपर्सना पराभूत केले होते. त्यामुळे मॅग्नसला ही लढत सोपी जाणार नाही, असा अंदाज होता. पहिल्या टाय ब्रेकरमध्ये प्रज्ञाननंदाने चांगला खेळ करताना सामन्यावर पकड घेतली होती, परंतु कार्लसनने चतुर खेळ केला. त्याने प्रज्ञाननंदाला वेळ वाया घालवण्यास भाग पाडले. हातातला वेळ निसटत जातोय असे दिसताच भारतीय खेळाडू गांगरला अन् हा गेम गमावला. टाय ब्रेकरच्या दुसऱ्या सामन्यापूर्वी कार्लसनने अर्धी लढाई जिंकली होती आणि त्याने हा गेम ड्रॉ खेळून वर्ल्ड कप उंचावला. कार्लसनने २.५-१.५ अशा फरकाने प्रज्ञाननंदाचा पराभव केला.
उप विजेता जरी ठरला असता तरी प्रज्ञाननंदाने भविष्यात त्याचेच राज्य चालेल हे सिद्ध केले... ३२ वर्षीय कार्लसनविरुद्ध त्याचा खेळ कौतुकास्पद होता आणि त्यामुळेच त्याची हवा आहे. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यानेही त्याचे कौतुक केले. असाच स्वप्नांचा पाठलाग करत राहा आणि भारताला तुझा अभिमान वाटेल अशी कामगिरी करत राहा, असा सल्ला त्याने युवा बुद्धीबळपटूला दिला.