बलवंत तक्षक
चंदीगड : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी स्वत:चा शब्द पाळताना टोकियो ऑलिम्पिक पदक विजेत्यांना स्वत:च्या हाताने बनविलेल्या भोजनाची मेजवानी दिली. कॅप्टनच्या शाही भोजनात पुलाव, चिकन, कोरमा, मै खारा पिशोरी, दाल मसरी, बिर्याणी, आलू - जिरा राईस, आदी मेन्यू होते.कॅप्टन यांनी स्वत: हे पदार्थ तयार केल्याने सर्व पदार्थांच्या चवीत भर पडली. कॅप्टन यांना वेगवेगळ्या रेसिपी बनविण्याचा आणि खाऊ घालण्याचा छंद आहे. वेळोवेळी ते शाही भोजन बनवितात. ऑलिम्पिक पदक विजेत्यांच्या गौरव सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी ते लवकरच सर्व विजेत्यांना आपल्या हाताने बनविलेले भोजन खाऊ घालणार असल्याचे घोषणा केली होती.
खेळाडूंना रात्रीच्या भोजनासाठी आपल्या निवासस्थानी आमंत्रित करीत त्यांनी स्वत:चा शब्द खरा केला. याप्रसंगी सुवर्ण विजेता नीरज चोप्रा, कांस्य विजेत्या हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीतसिंग, हरमनप्रीतसिंग, मनदीपसिंग हार्दिकसिंग, रुपिंदरपालसिंग, शमशेरसिंग, दिलप्रीतसिंग, गुरजंतसिंग, वरुण कुमार, सिमरनजितसिंग यांची उपस्थिती होती. अमरिंदरसिंग यांनी सर्वांना आनंदाने भोजन वाढले. सोबतच पदार्थ कसे झाले याबाबत आस्थेने विचारपूस केली. यावेळी खेळाडूंनी ऑलिम्पिकमधील अनुभव कथन केले.
सकाळपासून सुरू झाली होती लगबगमुख्यमंत्री म्हणाले, खेळाडूंसाठी भोजनाची तयारी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू केली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व पदार्थ तयार होते. पदार्थ तयार करताना फार आनंद आला. ‘आमचे खेळाडू पदक जिंकण्यासाठी जितकी कठोर मेहनत घेतात, त्या तुलनेत जेवण तयार करण्यासाठी लागणारी मेहनत काहीच नाही,’ असे कॅप्टन म्हणाले.