कझान (रशिया) : गोलरक्षक क्लोडियो ब्रावो याने केलेल्या अप्रतिम संरक्षणाच्या जोरावर चिलीने बलाढ्य पोर्तुगालचे कडवे आव्हान पेनल्टी शूटआऊटमध्ये परतावून कॉन्फेडरेशन फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ब्रावोच्या भक्कम बचावाच्या जोरावर चिलीने पोर्तुगालचा ३-० असा धुव्वा उडवला. विशेष म्हणजे दुखापतीमुळे ब्रावो स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांना मुकला होता. मात्र, यानंतर त्याने आपली छाप पाडली. निर्णायक उपांत्य सामना पेनल्टी शुटआऊटमध्ये गेल्यानंतर ब्रावोने रिकार्डो कुआरेस्मा, जोआओ मैन्तिन्हो आणि नानी यांची किक यशस्वीपणे रोखत, चिलीला अंतिम फेरीत नेले. विशेष म्हणजे, या शानदार विजयासह चिलीने सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात १२० मिनिटांपर्यंत दोन्ही संघांना एकही गोल करण्यात यश आले नाही. परिणामी सामना निकाली लावण्यासाठी पेनल्टी शुटआऊटमध्ये खेळविण्यात आला. एकीकडे, पोर्तुगालच्या खेळाडूंना गोल करण्यात अपयश आले असताना, विजेत्या चिलीकडून अर्तुरो विदाल, चार्ल्स आरांगुएज आणि एलेक्सिस सांचेज यांनी विजयी गोल नोंदवले. दरम्यान, पोर्तुगालचा स्टार स्ट्रायकर रोनाल्डो हा चौथ्या किंवा पाचव्या संधीवर पेनल्टी किक मारण्यास येणार होता. परंतु, ब्रावोच्या जबरदस्त प्रदर्शनानंतर रोनाल्डोला पेनल्टी किक मारण्याची संधीच मिळाली नाही. (वृत्तसंस्था)
चिली सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत
By admin | Published: June 30, 2017 12:47 AM