चीनमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी चीननेभारताच्या तीन खेळाडूंना प्रवेश नाकारल्याने भारताने सक्त भूमिका घेतली आहे. चीनच्या या पावलानंतर क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी आपला बीजिंग दौरा रद्द केला आहे. ते आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्यासाठी ते चीनमध्ये जाणार आहेत.
आशियाई क्रीडा स्पर्धेचं आयोजन यावेळी चीनमधील हांगझोऊमध्ये होणार आहे. या क्रीडा स्पर्धा २३ सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. तसेच त्या ८ ऑक्टोबरपर्यंत चालतील. भारताचे वुशू खेळाडूसुद्धा हांगझोऊमध्ये भाग घेणार होते. मात्र तीन वुशू खेळाडू न्येमान वांग्सू, ओनिलू टेगा आणि मेपुंग लाम्गू यांना चीनने प्रवेश देण्यास नकार दिला.
हे सर्व भारतीय खेळाडू अरुणाचल प्रदेशमधील रहिवासी आहेत. त्यामधील एकाला अॅक्रिडिएशन मिळालं होतं. तसेच दोघे वाट पाहत होते. मात्र जेव्हा बुधवारी टीम चीनसाठी रवाना झाली तेव्हा या खेळाडूंना विमानात चढण्याची परवानगी नाकारण्यात आली. त्यांच्याकडे विमानात बोर्डिंगसाठी योग्य ती परवानगी नव्हती.
त्यानंतर या खेळाडूंना दिल्लीतील जेएलएन स्टेडियममध्ये असलेल्या SAIच्या हॉस्टेलमध्ये परत आणण्यात आले. चीनमध्ये वुशू टीमच्या एका वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, आम्ही या प्रकरणाला आशियाई क्रीडा स्पर्धांची आयोजन समिती ओसीएसोबत उचललं आहे. हा वाद लवकरच मिटेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.
दरम्यान, चीनने यावर प्रतिक्रिया देताना भारताच्या तीन क्रीडापटूंना प्रवेश नाकारण्याच्या आपल्या निर्णयाला योग्य ठरवले आहे. चीनने सांगितले की, या खेळाडूंकडे योग्य कागदपत्रे नव्हती. मात्र अरुणाचल प्रदेशमध्ये असल्याने चीनने या खेळाडूंना प्रवेश देण्यास नकार दिला आहे, असा अंदाज वर्तवला जात आहे. कारण चीन अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाज असल्याचे सांगत तो भाग आपला असल्याचा दावा करत आहे.