ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २३ - चीनमध्ये पार पडलेल्या बास्केटबॉलच्या आशिया कपमध्ये भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली असली तरी संघातील शीख खेळाडूंना मात्र चीनमध्ये कटू अनूभवाला सामोरे जावे लागले. भारतीय संघातील दोन शीख खेळाडूंना सामन्या दरम्यान पगडी घालून खेळण्यास मज्जाव करण्यात आल्याने या खेळाडूंना पगडीविनाच मैदानात उतरावे लागले होते. यामुळे शीख खेळाडूंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
भारतीय बास्केटबॉल संघ काही दिवसांपूर्वी चीनमध्ये आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल फेडरेशनच्या आशिया कप स्पर्धेसाठी गेला होता. यास्पर्धेत भारताने चीनवर मात केलीच. त्याशिवाय इराण, जॉर्डन,आणि फिलीपाईन्स या देशांनाही काटे की टक्कर दिली होती. या दौ-यात भारताच्या कामगिरीने खेळाडूंच्या आत्मविश्वासात भर पडली असली तरी संघातील दोन शीख खेळाडू मात्र कटू आठवणी घेऊन दौ-यावरुन परतले आहेत. सामन्यापूर्वी अमृतपाल सिंग आणि अमरज्योत सिंग या दोघा शीख खेळाडूंना पगडी उतरवायला भाग पाडण्यात आले. बास्केटबॉलमधील नियमांनुसार सामन्यादरम्यान कोणताही खेळाडू अन्य कोणाला दुखापत होईल अशा गोष्टी घालून मैदानात उतरु शकणार नाही. याच नियमाचा दाखला देत दोघांनाही पगडी उतरवायला सांगण्यात आले. अखेरीस हे दोघेही विना पगडीच सामन्यात खेळत होते. सामन्याच्या काही क्षणांपूर्वी ऐवढा मोठा अपमान सहन करुनही अमृतपाल सिंगने सामन्यात १५ पॉईंट स्कोअर केले.
चीनमधील या अपमानाविषयी अमरज्योत म्हणतो, आजपर्यंत आम्ही नेहमी पगडी घालून खेळायचो. पण यंदा पहिल्यांदाच आम्हाला पगडी घालण्यास विरोध दर्शवण्यात आला. या घटनेने आम्ही अचंबित झालो होतो. सामन्यापूर्वी हा अपमान झाल्याने आम्ही निराशही झालो होतो.
दरम्यान, बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाला या घटनेची काहीही माहिती नव्हती. प्रसारमाध्यमांनी ही घटना निदर्शनास आणून दिल्यावर फेडरेशनचे प्रमुख आर. एस. गिल यांनी या प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. या प्रकरणी आम्ही आशिया आणि आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल फेडरेशनकडे दाद मागू. भविष्यात असे प्रकार होऊ नये यासाठी आम्ही पाठपुरावा करु असे आश्वासन गिल यांनी दिले. यापूर्वी कॅनडातर्फे खेळणा-या भारतीय वंशाच्या शीख खेळाडूला पगडी घालून मैदानात उतरु दिले नव्हते. अखेरीस या खेळाडूने कॅनडातील न्यायालयात याचिका केल्यावर न्यायालयाने बास्केटबॉलमधील नियमांमध्ये बदल करण्याची शिफारस केली होती.