हैदराबाद : चीनने आज येथे गाचीबावली इनडोअर स्टेडियममध्ये बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिपच्या महिला गटातील फायनलमध्ये जपानचा ३-२ असा पराभव करीत विजेतेपद पटकावले.जपानच्या नोजोमी ओकुहाराने चीनच्या शिजियान वाँगचा १७-२१, २१-१६, २१-१५ असा पराभव करीत विजयाने सुरुवात केली. मिसाकी मातसुतोमो-अयाका ताकाहाशी या दुहेरी जोडीने चीनच्या यिंग लुओ आणि किंग टियान यांच्यावर २१-१२, २१-१६ अशी मात करीत संघाची विजयी लय कायम ठेवली; परंतु चीनच्या यू सून हिने एकेरीत आपल्या संघाचे नशीब बदलले. तिने जपानच्या सयाका सातो हिचा २२-२०, २१-१९ असा पराभव केला. दुसऱ्या दुहेरी लढतीत चीनच्या यू लुओ आणि युआनटिंग टांग या जोडीने नाओको फुकुमॅन आणि कुरुमी यानाओ यांचा २१-११, २१-१० असा पराभव करीत संघाला बरोबरी साधून दिली. निर्णायक एकेरीत चीनच्या बिंगजियाओ ही हिने जपानच्या युई हाशिमोटो हिचा पराभव करीत संघाला विजय मिळवून दिला. या स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला होता.(वृत्तसंस्था)
चीनला महिला गटात विजेतेपद
By admin | Published: February 22, 2016 3:49 AM