ऑनलाइन लोकमतरिओ, दि. 18 : रिओ आॅलिम्पिकच्या टेबल टेनिस स्पर्धेत महिलांनी सुवर्णपदक जिंकल्यानंतर चीनच्या पुरुष संघानेदेखील जपानचा ३-१ असा पराभव करीत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. १९८८ नंतर टेबल टेनिसचा आॅलिम्पिकमध्ये समावेश केल्यानंतर चीनने आतापर्यंत ३२ पैकी २८ सुवर्णपदके जिंकली आहेत. चीनने दक्षिण कोरियाचा ३-१ आणि जपानने जर्मनीचा त्याच फरकाने पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती.
जपानने पहिली लढत गमावल्यानंतर जून मिजुतानीने जागतिक क्रमवारीतील तृतीय मानांकित चीनच्या शू शिनचा पराभव करीत १-१ अशी बरोबरी साधली. रिओत चीनचा हा पहिला पराभव होता. मिजुतानीने शू याच्याविरुद्ध आतापर्यंत ५0 लढती खेळल्या आहेत आणि हा त्याचा पहिला विजय आहे; परंतु त्यानंतर जपानच्या माहारू योशिमुरा आणि कोकी निवा यांना चीनच्या झांग जिक आणि शू याच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला आणि चीनने हा सामना ३-१ असा जिंकला. या गटात जर्मनीने दक्षिण कोरियाचा ३-१ असा पराभव करीत कास्यपदक जिंकले.व्हॉलीबॉलमध्ये जर्मनी अजिंक्य - जर्मनीच्या महिला व्हॉलीबॉल संघाने जादुई कामगिरी करताना यजमान ब्राझीलला नमवत रिओ आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. कोपाकबाना स्टेडियममध्ये झालेल्या या लढतीत जर्मनीने वेगवान हवा आणि आपल्या उंचीचा फायदा घेताना आपल्या संघाला सुवर्णपदक मिळवून दिले. जर्मनीने ब्राझीलला २१-१८, २१-१४ असे पराभूत केले. ब्राझीलने अमेरिकेवर मात करीत अंतिम फेरी गाठली होती. ब्राझीलच्या महिला संघाला १९९६ नंतर या स्पर्धेत एकदाही सुवर्णपदक जिंकता आले नव्हते. या वेळेस ते आपल्या घरच्या समर्थकांसमोरही इतिहास रचू शकले नाहीत. लुडविगने सामन्यानंतर म्हटले, ब्राझिली प्रेक्षकांसमोर आम्ही एकजूटतेने कामगिरी केली. येथे आम्हाला प्रेक्षकांनी समर्थन केल्याचा आम्हाला आनंद वाटतोय.