ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. १९ : भारताच्या आगामी ५०० व्या कसोटी सामन्याच्या निमित्ताने चाहत्यांना या सामन्यासोबत जुळवून घेण्याच्या उद्देशाने बीसीसीआयने ड्रीम टीम निवडण्याची योजना आखली आहे. कानपूरमध्ये भारत आणि न्यूझीलंड संघांदरम्यान २२ सप्टेंबरपासून तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला प्रारंभ होत आहे. टीम इंडियाचा हा ५०० वा कसोटी सामना आहे.
या योजनेुनसार जगभरातील क्रिकेट चाहत्यांना भारतीय संघाच्या फेसबुक पेज -डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.फेसबुक.कॉम : स्लॅश : इंडिया क्रिकेट टीम यावरील प्रश्नांना उत्तर देत भारताच्या ड्रीम टीमसाठी मत नोंदवता येईल.
बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सांगितले की,चाहते खेळाचा महत्त्वाचा भाग आहेत, असे माझे सुरुवातीपासूनचे मत आहे. ५०० व्या कसोटी सामन्याच्या ऐतिहासिक क्षणांचा आनंद साजरा करण्यासाठी यापेक्षा दुसरा कुठला पर्याय असू शकत नाही. चाहत्यांना आपल्या ड्रीम टीमसाठी मत नोंदवण्याची संधी मिळेल. एक लाख क्रिकेट चाहत्यांनी ड्रीम टीममधील आघाडीची फळी निवडण्यासाठी मत नोंदवले आहे. आगामी दिवसांमध्ये यात आणखी भर पडेल, अशी आशा आहे